Smruti Irani : केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्री स्मृती इराणी यांनी मासिक पाळी संदर्भात पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले आहे. स्मृती इराणी यांनी सशुल्क मासिक पाळी रजा धोरणाला विरोध केला होता. त्यांच्या या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया समोर आल्या, काहींनी त्यांचा विरोध केला तर काहींनी समर्थन केले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा स्मृती इराणी यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे.
आरजेडीचे खासदार मनोज कुमार झा यांनी १३ डिसेंबरला राज्यसभेत धोरणावरील चर्चेदरम्यान प्रश्न विचारला होता की, LGBTQIA+ समुदायामध्ये मासिक पाळीच्या स्वच्छतेचा प्रचार आणि सुविधांचा पुरवठा करण्यासाठी तरतुदी आहेत का? ज्यावर स्मृती इराणी यांनी उत्तर देत प्रश्न केला की, “कोणत्या समलिंगी पुरुषाला, गर्भाशयाशिवाय, मासिक पाळी येते?”
एका मुलाखतीत स्मृती इराणी म्हणाल्या की, “मनोज कुमार झा यांचा प्रश्न, एकतर धोरणाला विरोध करण्यासाठी, भडकवण्यासाठी किंवा लक्ष वेधून घेण्यासाठी होता. त्यांची इच्छा आहे की ‘मी (LGBTQIA समुदायाच्या) मासिक पाळीच्या स्वच्छतेसाठी कशी तरतूद करू शकते’ याबद्दल उत्तर द्यावे. पण समलिंगी पुरुषांसाठी हे मुळातच लागू होतं का?” असा सवाल स्मृती इराणी यांनी केला.
EP-123| Smriti Irani on Parliament Security Breach, I.N.D.I.A Bloc, Menstrual Leave Debate, T.V world#ANIPodcastwithSmitaPrakash #SmritiIrani #parliamentwintersession
Premiering now: https://t.co/txiyGx0NEy
— ANI (@ANI) December 21, 2023
स्मृती इराणी यांनी असेही म्हटले आहे की, मासिक पाळीबाबतच्या धोरणावर खोटे बोलल्याने राज्यसभा खासदार मनोज झा अडचणीत येऊ शकतात. ते म्हणाले, बिहारमध्ये खासगी क्षेत्रात कोणतेही धोरण नाही. बिहारमध्ये 1992 मध्ये महिलांसाठी खासगी नव्हे तर सरकारी नोकऱ्यांमध्ये पगारी रजेचे धोरण लागू करण्यात आले आहे.
स्मृती इराणी म्हणाल्या की, पगारी रजा मिळणे म्हणजे तुमच्या बॉस आणि एचआरला मासिक पाळी येण्याबद्दल सांगणे, पण महिलांनी त्या दिवसांची प्रसिद्धी का करावी? मासिक पाळीबद्दल तुमच्या बॉस आणि एचआरला का सांगाव? बॉस आणि एचआर यांना त्यांच्या महिला कर्मचाऱ्याच्या मासिक पाळीची माहिती का असावी? यामुळे महिलांना भेदभावाला सामोरे जावे लागणार नाही का? महिलांच्या कामात अडथळा येणार नाही का? त्यांना समाजात समान दर्जा देऊनही ते निराश होणार नाहीत का? पगारी रजा पॉलिसी केली तर महिलांवर अन्याय होईल. त्याच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होईल.
मासिक पाळीत महिलांच्या रजेवरून काय म्हणाल्या स्मृती इराणी?
‘सशुल्क (भरपगारी) मासिक पाळी रजा धोरणा’ला विरोध करत स्मृती इराणी राज्यसभेत असं म्हणाल्या होत्या की, ‘एक मासिक पाळी येणारी स्त्री म्हणून मी सांगू इच्छिते, की मासिक पाळी म्हणजे काही दिव्यांगत्व नाही. हा स्त्रियांच्या जीवन प्रवासाचा एक नैसर्गिक भाग आहे. स्त्रियांना समान संधी नाकारल्या जातील, अशा गोष्टी आपण मांडू नयेत. मासिक पाळी म्हणजे अपंगत्व नाही त्यासाठी भरपगारी सुट्टीच्या कोणत्याही विशिष्ट धोरणाची हमी देऊ नये असे इराणी यांनी म्हटले होते.