नोडल अधिकाऱ्यांचा निर्णय महत्त्वाचा
पुणे – अनलॉक 5च्या अनुषंगाने राज्य सरकारने रेल्वे सेवा सुरू करण्यास “ग्रीन’ सिग्नल दिला आहे. यासंदर्भात अंतिम निर्णय नोडल अधिकारी असणाऱ्या पोलीस आयुक्तांकडून घेण्यात येणार आहे.
पोलीस आणि रेल्वे प्रशासनामध्ये याबाबत प्राथमिक बैठक पार पडली. येत्या काही दिवसांत याचा निर्णय जाहीर करण्यात येणार आहे. मुंबईतील रेल्वे वाहतुकीच्या धर्तीवर पुण्यातील रेल्वे सुरू होण्याची शक्यता सूत्रांकडून वर्तविण्यात येत आहे.
करोनाच्या पार्श्वभूमीवर मार्च महिन्यापासून रेल्वेच्या प्रवासी सेवेला स्थगिती दिली होती. या कालावधीत केवळ मालगाड्या, पार्सल गाड्यांसह श्रमिक विशेष आणि विशेष गाड्या सोडण्यात येत होत्या. अनलॉकमुळे रेल्वे सुरू नसल्याने प्रवाशांची तारांबळ होत होती. याच अनुषंगाने लोकल, डेमू आणि इंटरसिटी सेवा सुरू करण्याची मागणी प्रवाशांकडून करण्यात येत होती.
अनलॉक 5 मध्ये लोकल आणि इंटरसिटी रेल्वेच्या फेऱ्या सुरू करण्याबाबत राज्य सरकारने देखील परवानगी दिली आहे. यासाठी राज्य सरकारने पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची नोडल ऑफिसर म्हणून नियुक्ती केली आहे. त्यामुळे पुणे विभागातील रेल्वे गाड्या सुरू करण्याबाबतचा निर्णय पुण्याचे पोलीस आयुक्त घेणार आहेत. यासाठी विशिष्ठ आराखडा देखील तयार करण्यात येणार आहे.
संदर्भात रेल्वेच्या पुणे विभागाचे अधिकारी आणि पोलीस प्रशासन यांची प्राथमिक बैठक पार पडली आहे. मात्र, रेल्वे सेवा सुरू होण्याबाबत प्रशासनाकडून अद्याप ठोस निर्णय झाला नसून, येत्या काळात चर्चा करून अंतिम निर्णय घेणार असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.