नगर – पक्षाचे संपर्कप्रमुख भाऊ कोरगांवकर व पक्षाचे नगरमधील बहुतेक नगरसेवक वरिष्ठांचे आदेश पाळणारेच आहेत. तथापि, गेल्या काही दिवसांत पक्षाचे शहरप्रमुख दिलीप सातपुते दुसऱ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून पक्षात जातीपातीचे राजकारण करत आहेत. सदस्य नोंदणीसाठी त्यांच्याकडे फॉर्मची मागणी केली असता, त्याकडे दुर्लक्ष करतात. दुर्दैवाने जिल्हाप्रमुखही लक्ष देत नाहीत.
त्यामुळे पक्षाचे शहरप्रमुख तातडीने बदलावेत, अशी मागणी शिवसेना नगरसेवक गणेश कवडे यांनी केली आहे.
जिल्हाप्रमुख व शहरप्रमुखांच्या अशा वागणुकीमुळे पक्षाची नगरमध्ये पीछेहाट होईल. सबब, वरिष्ठ नेत्यांचे आदेश मानणारे पक्षाचे नगरसेवक व पदाधिकारी लवकरच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेवून त्यांच्याकडे सद्यःस्थितीबाबत गाऱ्हाणे मांडणार आहेत, अशी माहिती कवडे यांनी आज माध्यमांना दिली.
संपर्कप्रमुख कोरगांवकर यांनी आजवर नगर जिल्ह्यात पक्ष संघटना वाढीसाठी सर्वांना बरोबर घेवून एकजुटीनेच प्रयत्न केले. परंतु सध्या शिवसेना शहरप्रमुख व त्यांच्या गटातील काही नगरसेवक, पदाधिकारी पक्षात मनमानी पद्धतीने काम करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांचेच निर्णय अंतिम असल्याचे ते सांगतात. स्थानिक पातळीवर पक्षातील अन्य नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मतेही ते विचारात घेत नाहीत. राज्याचे जलसंधारणमंत्री व शिवसेना उपनेते शंकरराव गडाख यांच्यासमवेत अलीकडेच झालेल्या बैठकीत सुद्धा शहरप्रमुखांनी एकजुटीची भूमिका घेतली नाही.
त्यांच्या मनमानीला आळा घालण्याचा प्रयत्न केल्यास ते आळा घालण्याचा प्रयत्न करणाऱ्यालाच कचाट्यात पकडण्याचा आराखडा तयार करतात. काही शिवसैनिक सोशल मीडियात अनधिकृत अकाऊंट बनवून त्याच्या माध्यमातूनही स्वपक्षाची व नेत्यांची अपशब्द वापरुन बदनामी करत आहेत, त्यावरही शहरप्रमुख कुठलीही कठोर भूमिका घेत नाहीत, अशी तक्रारही कवडे यांनी केली आहे.