मयूर सोनावणे
पोलिसांचे “सोयीस्कर’ दुर्लक्ष, ठोस कारवाईची आवश्यकता
सातारा – पुणे-बंगळुरू महामार्गावर नागेवाडी, ता. सातारा या गावाच्या परिसरात नव्याने झालेल्या एका लॉजवर गेल्या महिन्यांपासून महाविद्यालयीन युवक-युवती “प्रेमाचे धडे’ गिरवत असल्याची चर्चा आहे. प्रेमवीरांच्या चाळ्यांची माहिती असूनही पोलिसांचे त्याकडे “सोयीस्कर’ दुर्लक्ष होत आहे. लॉजमालकाकडून होणाऱ्या “लक्ष्मीदर्शना’वर पोलीस खूश असल्याची चर्चा स्थानिक नागरिकांमध्ये आहे.
सातारा जिल्ह्यातून जाणाऱ्या महामार्गाच्या कडेला शिरवळपासून कराडपर्यंत लहान-मोठ्या व्यावसायिकांनी आपले व्यवसाय थाटले आहेत. त्यामध्ये हॉटेल, लॉजेस, ढाबे यांची संख्या मोठी आहे. नागेवाडी, कुशी या गावांच्या परिसरात महामार्गाला लागून दीड दोन वर्षांपूर्वी एका लॉजची इमारत बांधण्यात आल अिाहे. या लॉजमध्ये सुरुवातीपासून अनेक गैरप्रकार होत असल्याची परिसरातील नागरिकांची तक्रार आहे.
अनेक स्त्री-पुरुष, विशेषत: महाविद्यालयीन तरुण-तरुणी या लॉजचा वापर अवैध संबंध जोपासण्यासाठी करत आहेत. अवैध संबंधांमधून भांडणे आणि त्यातून मारामाऱ्या होत आहेत. पोलिसांनी या लॉजवर कारवाई करून तेथील अवैध धंद बंद करणे गरजेचे असताना त्यांचे याकडे “सोयीस्कर’ दुर्लक्ष होत आहे.
एखाद्या लॉजवर राहायला येणाऱ्यांकडून लॉजमालक अथवा चालकांनी त्यांची ओळखपत्रे पाहणे गरजेचे आहे; परंतु एक-दोन तासांसाठी खोल्या भाड्याने घेणाऱ्यांकडून बक्कळ कमाई होत असल्याने लॉजमालक, चालकांकडून त्याकडे दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे या लॉजवर अवैध गोष्टी फोफावल्या आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये महाविद्यालयीन तरुण-तरुणींचा या लॉजवरील वावर वाढला असून याबाबत नागेवाडी, कुशी व परिसरातील गावांमध्ये चर्चा आहे. पोलिसांनी या प्रकाराची गांभीर्याने दखल घेऊन ठोस पावले उचलण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे.
कॉलेजच्या नावाखाली लॉजमध्ये
मुलांच्या शिक्षणासाठी पालक काबाडकष्ट करतात. पै न् पै जमवून ते मुलांना चांगले शिक्षण देण्यासाठी धडपडतात. मात्र, घरच्या परिस्थितीची जाणीव नसलेले काही विद्यार्थी-विद्यार्थिनी कॉलेजच्या नावाखाली लॉजवर जाऊन “प्रेमाचे धडे’ गिरवत आहेत. त्यामुळे समाजात गुन्हेगारी वाढत असून पोलिसांनी या लॉजवर वेळीच कारवाई करणे गरजेचे आहे, अशी प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त होत आहे.