सातारा : पोलीस दलातील करोना बाधितांचा आकडा आता वाढताना दिसू लागला आहे. आत्ता तर सोलापूर जिल्ह्यात आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या महिला पोलीस उपनिरीक्षकालाच करोनाची बाधा झाल्याचे समोर आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान पकडलेला आरोपीही करोना बाधित असल्याचे समोर आले आहे.
याबाबत सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, भुरकवडी (ता.खटाव) येथे काही दिवसापूर्वी एक विवाह झाला होता. मात्र, त्याच दिवशी मध्यरात्री नववधूने साथीदारांच्या मदतीने लग्न घरातील रोखड व सोन्याचे दागिने घेऊन पोबारा केल्याची घटना घडली होती. त्यानंतर वराच्या घरातील लोकांनी वडूज पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली होती. पोलिसांनी तातडीने चार संशयितांना अटक केली होती. मात्र, नववधूचा पत्ता लागत नव्हता.
शुक्रवार दि.13् रोजी पळालेली नववधू सोलापूर जिल्ह्यात असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक मालोजीराव देशमुख यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी एक पथक संशयित महिलेला पकडण्यासाठी पाठवले होते. त्या पथकाने सदर महिलेला अटक केली परंतू तीला करोनाची बाधा झाली असल्याने तिला पकडलेल्या महिला पोलीस उपनिरीक्षकालाही करोनाचा संसर्ग झाल्याचे तपासणीनंतर समोर आले आहे.