मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि पक्षाचं निवडणूक चिन्ह शिंदे गटाला दिल्यानंतर सर्वच स्तरांतून विविध प्रतिक्रिया समोर आल्या. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या शिवसेनेबाबतच्या निर्णयावर नाराजी व्यक्त करत उद्धव ठाकरे यांनी भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर निशाणा साधला होता. ठाकरेंच्या याच टीकेला भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर देताना आशिष शेलार यांनी त्यांना डबक्यातल्या बेडकाची उपमा दिली आहे. तसेच, बेडकानं फुगायचा प्रयत्न केला की, तो फुटतो, उद्धवजी तुमची आज तीच अवस्था झालीये, असे म्हणत त्यांच्यावर निशाणाही साधला आहे. पुणे दौऱ्यावर असणाऱ्या अमित शहांनी पुन्हा एकदा ठाकरेंवर निशाणा साधत 2014 मध्ये तुटलेल्या युतीचा पुनरुच्चार केला. त्यानंतर उद्धव ठाकरेंनीही याचा समाचार घेते थेट शाहांवर टीकेचे बाण सोडले. तसेच, अमित शहांचा उल्लेख मोगॅम्बो असा केला.
ठाकरेंच्या याच टीकेला प्रत्युत्तर देताना आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे सत्तापिपासू वृत्तीने वागले, असे म्हटले आहे. तसेच, आमचे फोन घेतले नाहीत. स्वतःच्या विचारांना तिलांजली देऊन हिंदुत्व सोडून हिंदुत्वाशी गद्दारी केली, असे म्हणत उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र डागले आहे.
“जे मोग्याम्बो म्हणतात, ते डबक्यातले बेडूक आहेत किती फुगलात तरी तुम्ही मोठे होऊ शकत नाही. बेडकानं फुगायचा प्रयत्न केला की, तो फुटतो, उद्धवजी तुमची आज तीच अवस्था झाली आहे.”, असे म्हणत अमित शहांवर टीका करणाऱ्या ठाकरेंना आशिष शेलार यांनी खडे बोल सुनावले आहेत.
शिवसेनेत उभी फूट पडली आणि राज्याच्या राजकारणाला वेगळीच कलाटणी मिळाली. काही दिवसांपूर्वी केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि पक्षाचं निवडणूक चिन्ह शिंदे गटाला दिलं आणि सर्वच स्तरांतून विविध प्रतिक्रिया समोर आल्या. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या शिवसेनेबाबतच्या निर्णयावर नाराजी व्यक्त करत उद्धव ठाकरे यांनी भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर निशाणा साधला. “मोगॅम्बो खुश हुआ” , असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी नाव न घेता अमित शहांवर थेट तोफ डागली आहे.