पिंपरी- आमदार सुनील शेळके स्वतः भाजपमध्ये पदाधिकारी होते. ते आमदार होण्यासाठी राष्ट्रवादीत आले. त्यामुळे त्यांच्याकडून राजकारणाचे धडे घेण्याची गरज नाही. त्यांनी आम्हाला अक्कल शिकवू नये, असा इशारा चिंचवड मतदार संघातील अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांनी दिला आहे. मी स्वतः चिंचवड मतदार संघाच्या विकासासाठी कामे केली आहेत. विविध प्रश्नांवर आंदोलनेही केली आहेत, त्याच बळावर मी जनतेच्या आशीर्वादाने ही निवडणूक लढवत असून, चिंचवडची सुज्ञ जनता निश्चितपणे माझ्या मागे उभी राहील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
पिंपळे निलख येथे महाविकास आघाडीच्या प्रचारार्थ आयोजित सभेत आमदार सुनील शेळके यांनी कलाटे यांच्या संदर्भात वक्तव्य केले होते. त्याला चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीतील अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांनी उत्तर दिले आहे. कलाटे म्हणाले की, वाकड परिसरात लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना मी अनेक विकास कामे केली आहेत. त्यामधील शंभर कोटींची विकासकामे मंजुरीसाठी असताना दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांनी स्थायी समिती अध्यक्षांना सांगून ती कामे स्थायी समितीत रोखली. त्याबाबत मी राज्य शासनाकडे पाठपुरावा करून नगर विकास विभागामार्फत ही कामे जनतेच्या विकासासाठी मार्गी लावली. अनेक विकास कामांसाठी केंद्र व राज्य सरकारकडे पाठपुरावा केला. तसेच मुंबई-बेंगलोर रस्त्यावर ताथवडे व पुनावळे आणि भूमकर चौक, वाकड येथे नवीन “सब- वे’साठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना साकडे घातले.
पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीमधील ताथवडे येथून जाणाऱ्या मुंबई-बंगळुरू रस्त्यालगत 60 मीटर रस्त्याच्या दोन्ही बाजूने 12 मीटर सर्व्हिस रस्ता प्रस्तावित करण्याबाबतच्या प्रस्तावाला मान्यता द्यावी. सांगवी ते किवळे बीआरटी मार्गावरील ताथवडे, पुनावळे हद्दीपासून पुनावळे, रावेत पुलापर्यंत आणि रावेत गावठाणापासून किवळे हद्दीतील मुकाई चौकापर्यंत मंजूर विकास योजनेत असलेली 30 मीटर रस्ता रुंदी 45 मीटर करण्यासाठीच्या फेरबदलास मान्यता देण्याची मागणी 9 एप्रिल 2022 रोजी राज्य सरकारकडे केली.
याबाबत तत्कालीन नगरविकास, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथजी शिंदे यांची भेट घेतली. त्यांना मागणीचे निवेदन दिले. त्यावर शिंदे यांनी तत्काळ प्रस्ताव सादर करण्याचे आदेश विभागाच्या प्रधानसचिवांना दिले. विविध विकासकामे मार्गे लावल्याने चिंचवड मतदार संघातील लोकांच्या कामासाठी मी तत्पर राहणारा लोकप्रतिनिधी आहे हे जनतेला कळून चुकले आहे आणि मीही ते सिद्ध केल्यामुळे चिंचवड मतदार संघाबाहेरील सुनील शेळके यांनी इथे येऊन आम्हाला अक्कल शिकवू नये, असा इशारा कलाटे यांनी दिला आहे.