नवी दिल्ली – आज दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 25 वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. यानिमित्त दिल्लीत आयोजित कार्यक्रमात बोलताना शरद पवारांनी मोठी घोषणा केली. सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यावर पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आहे. यासोबतच पक्षातील इतर काही नेत्यांवर अतिरिक्त जबाबदारी सोपवण्याचीही घोषणा यावेळी पवारांनी केली आहे. मात्र, यामध्ये अजित पवार यांचे नाव नसल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
यावेळी शरद पवार यांनी प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे यांच्यावर कार्यकारी अध्यक्ष पदाची जबाबदारी दिली. तसेच खासदार सुनिल तटकरे, डॉ. योगनानंद शास्त्री, के.के. शर्मा, पी.पी. महोम्मद फैजल, नरेंद्र वर्मा, जितेंद्र आव्हाड, एस. आर. कोहली, नसीम सिद्दकी या सहकाऱ्यांना पक्षांतर्गत विविध महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. परंतु अजित पवार यांच्यांवर सध्यातरी कोणतीही जबाबदारी दिली नाही.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदाची जबाबदारी मिळाल्यानंतर यावर आता राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी पटेल यांना प्रश्न विचारण्यात आला की, ‘पक्षाच्या कार्याध्यक्षपदी नेमणूक झाल्यावर तुमच्यासमोरचं पहिलं आव्हान काय असेल? यावर प्रफुल्ल पटेल म्हणाले.
पक्षाच्या कार्यध्यक्षपदी निवड होणं ही आनंदाची बाब पण ही नवीन गोष्ट नाही. त्याचबरोबर सुप्रियाताई देखील सोबत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पुन्हा एकदा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळवून देणं हे पहिलं आव्हान असेल. पक्षाला निवडणूक आयोगाकडून राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळवून देणं ही सर्वच नेत्यांची जबाबदारी असेल.
नागालँडमध्ये आमच्या पक्षाला मान्यता मिळाली आहे. अशा आणखी दोन तीन राज्यांमध्ये आमचे जास्तीत जास्त आमदार आणि मतांची टक्केवारी आणणं हे आमचं आव्हान असेल. त्या दृष्टीने आम्हाला काम करावं लागेल. एका प्रसिद्ध वृत्तवाहिनीच्या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या भावना व्यक्त केला आहेत.