मुंबई – भारतीय जनता पक्ष एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला लोकसभेच्या प्रत्येक जागेसाठी “रडवणार” आहे, असे मत ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे. कल्याणच्या लोकसभेच्या जागेवर भाजपने दावा केला आहे, त्यामुळे शिंदे गट आणि भाजप यांच्यात आत्तापासूनच संदोपसुंदी सुरू झाली आहे.
या पार्श्वभूमीवर राऊत यांनी हे प्रतिपादन केले आहे. कल्याणच्या जागेवर सध्या एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे हे खासदार आहेत. आणि ते येथून दोन वेळा निवडून आले आहेत.
तिथल्या वादाच्या पार्श्वभूमीवर बोलताना संजय राऊत म्हणाले की, कल्याण-डोंबिवली परिसर हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे आणि पक्ष गेल्या अनेक वर्षांपासून तिथून जिंकत आहे. तीच जागा पक्षाशी संबंध नसलेल्या श्रीकांत शिंदे यांना देण्यात आली होती. उद्धव ठाकरेंनी शिंदे यांच्या मुलाचे लाड केले होते.
आता त्यांना त्यांची लढाई लढू द्या. प्रत्येक जागेसाठी भाजप शिंदे गटाला रडायला लावेल, असे राऊत यांनी सांगितले. कल्याणमध्ये शिंदे यांना डावलून शिवसेनेच्या सर्व नेत्यांना कमळाच्या चिन्हावर निवडणूक लढवण्याची भाजपची योजना आहे, असे राष्ट्रवादी कॉंग्रेसने म्हटले आहे.