पुणे – राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून बाहेर पडलेले अजित पवार यांनी बंडानंतरच्या पहिल्याच जाहीर सभेत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांना त्यांच्या वयाची आठवण करून देत टोले लगावले. शासकीय अधिकारी वयाच्या 58व्या वर्षी निवृत्त होतात. सनदी अधिकारी वयाच्या 60व्या वर्षी निवृत्त होतात तसेच भारतीय जनता पक्षामध्ये 75 व्या वर्षी निवृत्त व्हावे लागते. लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी यांनाही हा नियम लागू करण्यात आला होता. 83व्या वर्षी थांबणार आहात की नाही. परंतु, शरद पवार यांच्या वयाचा उल्लेख अजित पवार करीत असताना त्यांच्यासोबत आलेल्या आमदारांच्या वयाचीही चर्चा सामान्य मतदारांत होत आहे.
1) शासकीय अधिकारी 58व्या वर्षी निवृत्त होतात असे सांगणाऱ्या अजित पवार यांचे वय 63 आहे. त्यांचा जन्म 22 जुलै 1959 रोजी झाला आहे.
2) अजित पवार गटातील सर्वात युवा आमदार असलेल्या अदिती तटकरे यांचा जन्म 16 मार्च 1988 रोजी झाला असून त्या 35 वर्षांच्या आहेत.
3) अजित पवार यांचे खंदे समर्थक म्हणून ओळख असलेले धनंजय मुंडे यांचा जन्म 15 जुलै 1975 रोजी झाला. आता ते 48 वर्षांचे होतील.
4) अजित पवार गटातील संजय बनसोडे यांचा जन्म 31 डिसेंबर 1973 रोजी झाला असून ते 49 वर्षांचे आहेत.
5) अनिल पाटील यांचा जन्म 7 जुलै 1968 रोजीचा आहे. अनिल पाटील यांचा आजच वाढदिवस असून ते 55 वर्षांचे झाले आहेत.
6) अजित पवारांबरोबर मंत्रीपदाची शपथ घेतलेले धर्मरावराजे बाबा आत्राम हे 56 वर्षांचे आहेत.
7) शरद पवारांच्या जवळचे असलेले मात्र अजित पवार गटात सहभागी झालेले दिलीप वळसे पाटील यांचा जन्म 30 ऑक्टोबर 1956 रोजीचा असून ते 66 वर्षांचे आहेत.
8) केंद्रातील राष्ट्रवादीचा विश्वासाचा चेहरा असलेले प्रफुल्ल पटेल यांची जन्म तारीख 17 फेब्रुवारी 1957 अशी असून ते 66 वर्षांचे आहेत.
9) हसन मुश्रीफ यांचा जन्म 24 मार्च 1954 रोजीचा आहे. ते 69 वर्षांचे आहेत. त्यांनी विविध खाती सांभाळली आहेत.
10) अजित पवार यांच्या गटातील सर्वाधिक ज्येष्ठ असलेले छगन भुजबळ यांचा जन्म 15 ऑक्टोबर 1947 रोजी झाला असून ते 75 वर्षांचे आहेत.
शहरात नवे कार्यालय
राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर अजित पवार विरुद्ध शरद पवार असे दोन गट तयार झाले आहेत. आमदारांसोबत कार्यकर्ते पदाधिकारी यांच्यातही गटबाजी सुरू झाली. आगामी काळात दोन्ही गटांना राजकीय तसेच कायदेशीर संघर्ष करावा लागणार आहे. यामुळेच अजित पवार यांच्याकडून स्वतंत्र कार्यालय सुरू करण्याबरोबरच नव्यान नियुक्त्याही केल्या जात आहेत. याशिवाय अजित पवार गटाकडून शहरात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नवे कार्यालयही शहरात सुरू केले जाणार आहे. पुणे शहरात राष्ट्रवादीतही फूट पडलेली असल्याने डॅमेज कंट्रोल करण्यासाठी नवे पदाधिकारी कार्य करतील.
पालकमंत्रिपदी “दादा’
पुणे महापालिकेवर भाजपची सत्ता असतानाही अजितदादांनी पालिका प्रशासनावर वर्चस्व ठेवले होते. विरोधी पक्षनेते असतानाही शहरातील बहुतांशी निर्णायक बैठकींसाठी अधिकाऱ्यांकडून अजित पवार यांना निमंत्रण दिले जाते. आता, पुण्याचे पालकमंत्री असलेले चंद्रकांतदादा पाटील आणि अजित पवार हे एकाच सरकारमध्ये आहेत. यापूर्वी अनेकदा अजित पवार यांनी या पदाचा भार सांभाळलेला आहे. यावेळी पुण्याचे पालकमंत्री त्यांच्याकडे जाऊ शकते, यामुळे चंद्रकांत पाटील यांची अडचण होणार आहे. यातून “दादा’ विरुद्ध “दादा’ असा पेच शहरात भाजपसमोर निर्माण होऊ शकतो.
“फ्लेक्स’वर “साहेब’च…
पुणे जिल्ह्यात अजित पवार विरुद्ध शरद पवार गट यांच्यामध्ये थेट संघर्ष सध्या पाहायला मिळत नसला, तरी पक्षातील दुसऱ्या, तिसऱ्या फळीतील पदाधिकारी, कार्यकर्ते संभ्रमावस्थेत आहेत. याच कारणातून शरद पवार यांनी सूचना केलेली असतानाही अनेक ठिकाणी फ्लेक्सवर शरद पवार यांचे मोठमोठे फोटो दिसत आहेत. आपला फोटो वापरू नये, असा सज्जड इशारा शरद पवार यांनी दिलेला असतानाही अजित पवार गटातील पदाधिकारी, कार्यकर्ते फ्लेक्सवर शरद पवार यांचा फोटो वापरत आहेत. पवार साहेंबाबाबत आम्हला आदर असल्याचे कार्यकर्ते उघडपणे सांगत आहेत.
पक्ष सोडणाऱ्यांवर कारवाई
शरद पवार यांचा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष सोडणाऱ्यांवर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांकडून कारवाई करण्यात आली आहे. यापुढे पक्षाचे चिन्ह वापरु नये, अन्यथा कायदेशीर कारवाई करू, असे पत्र देखील जयंत पाटील यांनी संबंधीतांना पाठविले आहे. राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण असतानाच अजित पवार यांना पाठिंबा दिल्याने अनेकांवर पक्षाकडून कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्या जागी नव्याने नियुक्त्या केल्या जात आहेत. जिल्हाध्यक्ष तसेच तालुकाध्यक्ष पदावरून उचलबांगडी करण्याची कारवाई सध्या सुरू करण्यात आली आहे.