मुंबई – शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यापासून यामागे भाजपची फूस असल्याचा आरोप महाविकास आघाडीतील नेते करत आहेत. अर्थात एकनाथ शिंदे यांनी बंडखोर आमदारांना ठेवण्यासाठी प्रथम गुजरात व त्यानंतर आसामची निवड केली होती. ही दोन्ही राज्यं भाजप शासित आहेत. आमदारांना गुजरातेतून गुवाहाटीला हलवताना पोलीस, सीआरपीएफ व नागरी उड्डाण मंत्रालयाने बजावलेल्या चोख भूमिकेवरून यामागे भाजपचं असावं अशी शंका बळावली होती. अशातच आता एकनाथ शिंदे यांचा एक व्हिडीओ समोर आला असून यामध्ये ते बंडखोर आमदारांशी संवाद साधताना भाजपबाबत बोलताना दिसतायेत.
नेमकं काय आहे व्हिडिओमध्ये?
१ मिनिट २९ सेकंदाच्या या व्हिडिओमध्ये शिंदे व त्यांचे समर्थक बंडखोर सेना आमदार असल्याचं दिसतंय. व्हिडिओमध्ये काय काय आहे वाचा…
सर्वाधिकार एकनाथ शिंदेंकडे
व्हिडिओमध्ये एकनाथ शिंदे व सर्व बंडखोर आमदार समोरासमोर बसलेलं दिसतंय. यावेळी तानाजी सावंत हे उभा राहून आम्ही सर्व आमदार एकमताने आमच्याबाबत सर्व निर्णय घेण्याचा अधिकार एकनाथ शिंदे यांना देतो अशी घोषणा करताना दिसतायेत. तसेच शिंदे यांची गटनेता म्हणून केल्याची देखील घोषणा करतायेत. त्यांच्या या घोषणेला सर्व उपस्थित आमदार हात वर करून अनुमोदन देतात. यावेळी शिंदे हे देखील हात वर करतात यावर इतर आमदार त्यांना तुम्ही स्वीकारा नेतृत्व आमचं असं म्हणतायेत.
भाजपचं नाव न घेता शिंदे म्हणतात….
यावेळी शिंदे आमदारांना संबोधित करताना, ‘जे काही सुख दुःख आहे ते आपल्या सर्वांचं एक आहे. काही असेल तर आपण एकजुटीने किती काही होऊद्या विजय आपलाच आहे.’ असा विश्वास देतात.
पुढे शिंदे म्हणतात, ‘तो एक राष्ट्रीय पक्ष (भाजप) आहे. महाशक्ती आहे. त्यांनी मला सांगितलं आहे तुम्ही जो निर्णय घेतलाय तो देशातील ऐतिहासिक आहे. तुमच्यामागे आमची पूर्ण शक्ती आहे. काहीही लागलं तरी कमी पडणार नाही. त्याची प्रचिती तुम्हा सर्वांना येईलच.”
दरम्यान, भाजप नेत्यांनी शिंदे यांच्या बंडामागे पक्षाची कोणतीही भूमिका नसल्याचे सांगितले होते. मात्र शिंदे यांचा हा व्हिडीओ समोर आल्यानंतर या बंडाला भाजपने ताकद दिली असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.