मुंबई : राज्यात अजित पवार हे बंड करून राज्यातील शिंदे-भाजप सरकारमध्ये सामील झाले. त्यानंतर आता अजित पवार यांच्यावर टीका टिप्पणी करण्यात येत आहे. त्यातच शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी पहिल्यांदाच अजित पवार यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
याविषयी बोलताना, ‘अजित पवार महाविकास आघाडीत असताना एकनाथ शिंदेंना ज्युनियर म्हणाले होते. महाविकास आघाडी स्थापन करताना अजित पवारांनी एकनाथ शिंदेंचं नाव घेऊन सांगितलं होतं की अशा ज्युनिअर लोकांना मुख्यमंत्री करणार असाल तर त्यांच्या हाताखाली आम्ही काम करणार नाही. ही अजित पवारांची अट होती. त्यावेळी मुख्यमंत्री कोण होणार याचा निर्णय होणार होता. पण त्यावेळी आम्ही त्यांना समजावून सांगितलं होतं की एकनाथ शिंदे हे ज्युनिअर नाहीत ते अनेक वर्षे राजकारणात आहेत. मात्र तेव्हा ज्युनिअर माणसाच्या हाताखाली काम करत आहेत हे वास्तव आहे ?’ असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
पुढे बोलताना त्यांनी ‘आता एकनाथ शिंदे यांच्याबरोबर गेलेल्या आमदारांमध्ये त्यांच्याविषयीच संशय निर्माण झाला आहे. अजित पवार सरकारमध्ये आल्यामुळे शिंदे गटातल्या आमदारांच्या मनात नाराजी आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री राहतील की नाही? हा संशय त्यांच्याच आमदारांच्या मनात आहे. अशा डाऊटफुल सरकारच्या नेतृत्वात महाराष्ट्राची वाटचाल होते आहे हे दुर्दैवी आहे असेही संजय राऊत यांनी म्हटले आहे.
आपसात लढून हे जीर्ण होतील असाही टोलाही संजय राऊत यांनी लगावला आहे. आम्ही शरद पवारांशी चर्चा केली आहे. महाविकास आघाडी वेगाने काम करते आहे. महाविकास आघाडी मजबूत आहे. मविआविषयी कुणाच्या मनात शंका असण्याचं कारण नाही असेही संजय राऊत यांनी म्हटलं आहे. उद्धव ठाकरे, शरद पवार, काँग्रेसचे नेते जेव्हा महाराष्ट्रात फिरायला लागतील तेव्हा आत्ता जे मजा करत आहेत त्यांची मजा संपणार आहे असेही यावेळी त्यांनी बोलून दाखवले.