“मागील सरकारने तेलाचे प्रकल्प तरी उभारले तुम्ही सात वर्षात काय केले ?”;काँग्रेसचा सरकारला सवाल

मुंबई : देशात पेट्रोल-डिझेल आणि घरगुती सिलेंडरच्या वाढत्या किमतीने सर्वसामान्यांचे हाल होताना पाहायला मिळत आहे तर दुसरीकडे याच मुद्द्यावरून सरकारला विरोधकांनी चांगलेच घेरले आहे. त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधनाच्या वाढत्या दरांसाठी आधीच्या सरकारांना जबाबदार ठरवले होते. मोदींच्या या टीकेवरून माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी मोदीं सडेतोड उत्तर दिले आहे. “मागील सरकारने कमीतकमी देशातंर्गत तेल प्रकल्प तरी उभारले. तुम्ही सात वर्षांत काय केले ते सांगा,” असे चव्हाण यांनी म्हटले आहे.

“केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळेच पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅसची दरवाढ होत आहे. आपला नाकर्तेपणा लपविण्यासाठी दुसऱ्यांकडे बोट दाखवण्यात केंद्र सरकार धन्यता मानत आहे, अशी टीका पृथ्वाराज चव्हाण यांनी केली. सातारा जिल्हा कॉंग्रेस समितीच्या पदाधिकाऱ्यांना नियुक्तिपत्रे प्रदान कार्यक्रमासाठी ते साताऱ्यात आले होते. यावेळी त्यांनी केंद्र सरकारच्या धोरणांवर आणि कार्यपद्धतीवर सडकून टीका केली.

इंधन दरवाढीबाबत प्रश्‍नावर चव्हाण यांनी, “देशाच्या मागणीच्या तुलनेत ८५ टक्के तेल आयात करावे लागत आहे. या तेलाची किंमत आंतरराष्ट्रीय पातळीवर निश्‍चित होते. चुकीच्या कररचनेमुळे आणि केंद्र सरकारच्या आडमुठेपणामुळे देशवासीयांना पेट्रोल, डिझेल महाग मिळत आहे. आधीच्या सरकारांनी देशातील साठ्यांचा शोध घेत तेल प्रकल्प उभारले आहेत. तुम्ही सात वर्षांत कोणते प्रकल्प उभारले ते जाहीरपणे सांगा. करोना काळातील मदतीचे फुगीर आकडे सांगत सर्वसामान्यांना लुटायचे काम सुरू आहे,” अशा शब्दात चव्हाण यांनी मोदींवर निशाणा साधला.

विविध कारणांवरून विरोधकांनी राज्य सरकारवर टीकेची झोड उठवल्याच्या प्रश्‍नावर चव्हाण यांनी भाजपाचा समाचार घेतला. “विरोधकांचे कामच टीका करणे असते. राज्यात सुरू असलेल्या अवकाळीत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठीचा विषय येत्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडणार आहे,” असे चव्हाण म्हणाले. “जिल्हा बॅंक निवडणुकीबाबत आमची अंतर्गत चर्चा सुरू आहे. त्यावर आताच भाष्य करणे योग्य होणार नाही. आगामी काळात महाविकास आघाडीच्या धोरणानुसारच महामंडळावरील पदाधिकाऱ्यांच्या निवडी होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.