सुरक्षेत कपात केल्यानंतर काय म्हणाले चंद्रकांत पाटील-

मुंबई – राज्यात सत्तेवर असलेल्या महाविकास आघाडी सरकारकडून काही बड्या नेत्यांच्या सुरक्षेत कपात करण्यात आली आहे. यात प्रामुख्याने भाजपा नेते आहेत.

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि सध्या विरोधी पक्षनेते असलेले देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड या नेत्यांचा यात समावेश आहे. तसेच देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या सुरक्षेत कपात करण्यात आली आहे.

अचानक घेण्यात आलेल्या या निर्णयामुळे अनेक स्तरांतून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

आपल्या सुरक्षेत कपात केल्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. पाटील म्हणाले की, ‘आम्हा लोकप्रतिनिधींना सुरक्षेची गरज नसून ही सुरक्षा जनतेला आणि महिलांना पुरवण्यात यावी.’

राज्यात कायदा आणि सुव्यवस्था दिवसेंदिवस बिघडत असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. लोकप्रतिनिधींऐवजी समाज सुरक्षित राहण्यासाठी राज्य सरकारने लक्ष्य द्यावे, असा टोलाही चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकारला लगावला आहे.

राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था सुरळीत होत नाही, तद्वतच महिलांना पूर्ण सुरक्षा मिळत नाही, तोपर्यंत कोणत्याही लोकप्रतिनिधीला सुरक्षेची गरज नसल्याचेही चंद्रकांत पाटील म्हणाले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.