नवी दिल्ली : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले चक्रीवादळ ‘आसानी’ उत्तर-पश्चिम दिशेने आंध्र-ओडिशा किनारपट्टीकडे सरकत आहे. ते मंगळवारी पश्चिम-मध्य आणि लगतच्या उत्तर-पश्चिम बंगालच्या उपसागरात पोहोचल्यावर उत्तर-पूर्वकडे वळणे आणि ओडिशाच्या किनाऱ्यापासून उत्तर-पश्चिम बंगालच्या उपसागराकडे सरकण्याची दाट शक्यता आहे.
याआधी चक्रीवादळामुळे कोलकात्यासह अनेक भागात मुसळधार पाऊस झाला आहे. त्यामुळे कोलकात्यात अनेक ठिकाणी पाणी साचल्याची स्थिती दिसून आली.हवामान खात्याने मच्छिमारांना 9 मे रोजी बंगालच्या उपसागराच्या मध्यवर्ती भागात न जाण्याचा सल्ला दिला आहे. शिवाय हवामान खात्याने मच्छिमारांना 9 आणि 10 मे रोजी पश्चिम मध्य बंगालच्या उपसागरात आणि 10 मे ते 12 मे पर्यंत बंगालच्या उत्तर-पश्चिम उपसागरात न जाण्याचा सल्ला दिला आहे.
हवामान खात्याने ‘असानी’ चक्रीवादळाचा वेग आणि तीव्रतेचा अंदाज व्यक्त करताना म्हटले की, हे चक्रीवादळ बुधवारी तीव्र चक्रीवादळात रूपांतरित होण्याची आणि गुरुवारपर्यंत तीव्र दाबात रुपांतर होण्याची शक्यता आहे. आयएमडीचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी सांगितले की, चक्रीवादळ पूर्व किनारपट्टीला समांतर सरकेल आणि मंगळवारी संध्याकाळपासून पाऊस पडेल.
दरम्यान पुढील 5 दिवसात ईशान्य भारतात हलका ते मध्यम पाऊस आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. 10 आणि 12 मे दरम्यान अरुणाचल प्रदेशात आणि 09-12 मे दरम्यान आसाम-मेघालय आणि मिझोराम आणि त्रिपुरामध्ये अतिवृष्टीची शक्यता आहे. त्याचबरोबर 08 ते 12 तारखेदरम्यान राजस्थानच्या विविध भागात उष्णतेची लाट येण्याची दाट शक्यता आहे.
#WATCH | West Bengal: Severe waterlogging witnessed in Kolkata after heavy rainfall amidst the effect of #CycloneAsani
Visuals from Golf Green pic.twitter.com/P4xFl9HJox
— ANI (@ANI) May 9, 2022
हवामानाबाबतच्या आपल्या अंदाजात, IMD ने, उत्तर-मध्य महाराष्ट्रात 09 मे रोजी पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. दुसरीकडे, पश्चिम मध्य प्रदेशात 9 ते 12 मे दरम्यान आणि दक्षिण हरियाणा, दिल्ली आणि दक्षिण पंजाबमध्ये 10 ते 12 मे दरम्यान ढगांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता व्यक्त केली आहे.