पुणे – बिबवेवाडी परिसरात आयोजित करण्यात आलेल्या जितो कनेक्ट २०२२ या व्यापार विषयक प्रदर्शनात चोरट्यांनी धुमाकूळ घातला. प्रदर्शनात वेगवेगळ्या चार स्टॉलमधून पाच लाख रुपयांची रोकड चोरट्यांनी लांबविल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
व्यावसायिक निलेश पारख (वय ४७, रा. चव्हाणनगर, धनकवडी) यांनी या संदर्भात बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मार्केट यार्ड- कोंढवा रस्त्यावर जितो कनेक्ट २०२२ व्यापार विषयक परिषद तसेच प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. रविवारी प्रदर्शनाची सांगता झाली. प्रदर्शनात व्यावसायिकांनी स्टाॅल लावले होते. पारख, प्रशांत लुणावत, प्रतीक रांका यांच्या स्टाॅलमधील तिजोरीतून चोरट्यांनी रोकड चोरली. योगेश चुत्तर यांचा स्टाॅल तसेच अन्य दोन स्टाॅलमधून चोरट्यांनी रोकड चोरली.
चोरट्यांनी एकुण मिळून चार लाख ५५ हजारांची रोकड, हिरेजडीत ब्रेसलेट, दोन मोबाइल संच असा ऐवज लांबविला. पोलिसांकडे तक्रार देण्यात आल्यानंतर प्रदर्शनातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले चित्रीकरण तपासासाठी ताब्यात घेण्यात आले आहे. पोलीस उपनिरीक्षक संजय आदलिंग तपास करत आहेत.