मुंबई – विकी कौशल आणि कतरिना कैफच्या लग्नाची धामधूम सुरू आहे. राजस्थानात सवाई माधोपूरमधील आलिशान हॉटेलमध्ये या दोघांचा विवाह समारंभ होतो आहे. अख्ख्या बॉलीवूडकडून या दोघांना शुभेच्छा दिल्या जात आहेत.
मात्र, कंगनाने कतरिनाला शुभेच्छा देतानाच एक टोमणा मारला आहे. सोशल मीडियावर केलेल्या एका पोस्टमध्ये कतरिनाचे नाव न घेता कंगनाने हा टोमणा मारला आहे. तिने कतरिना आणि विकी कौशल यांच्यात असलेल्या वयातील फरकाच्या मुद्द्यावरूनही शेरेबाजी केली आहे.
बॉलीवूडमधील सक्सेसफुल आणि वयाने मोठ्या अभिनेत्री आपल्यापेक्षा कमी वयाच्या ऍक्टरबरोबर डेटिंग करून रुढीवादी धोरणांना छेद देत आहेत, असे तिने म्हटले आहे. यशस्वी आणि श्रीमंत पुरुषांनी आपल्यापेक्षा कमी वयाच्या महिलांबरोबर विवाह करण्याची अनेक उदाहरणे आपण बघितली आहेत.
मात्र, पुरुषांकडून आपल्यापेक्षा वयाने मोठी आणि अधिक यशस्वी महिलेबरोबर विवाह मान्य केला जाणे फारच कमी दिसते. अशा वयाने मोठ्या आणि श्रीमंत अभिनेत्रींना आपल्या वयाचा पती मिळणे कठीणच असते. अशावेळी रुढीवादी विचार बाजूला ठेवून वयाने कमी पुरुषाला स्वीकारले जाणे कौतुकास्पद आहे.