आम्ही ये-जा करणार नाही, कायम सत्तेत राहू

‘मी पुन्हा येईन’वरुन खासदार संजय राऊतांचा फडणवीसांना टोला

मुंबई : राज्यातील भाजप आणि शिवसेनेची युती राज्यातील मुख्यमंत्रीपदावरुन तुटली असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर दोन्ही पक्ष एकमेकांना दोषदेताना दिसत आहेत. त्यातच आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भाजपवर टीका केली आहे. महाराष्ट्र सध्या विकास आणि पायाभूत सुविधांमध्ये अग्रस्थानी आहे. तरीही पायाभूत सुविधा आणि ओला दुष्काळ यावर अधिक काम करावे लागणार आहे. तुम्ही पुढील पाच वर्ष काय घेऊन बसलात. पुढची वर्ष राज्यात शिवसेनेचाच मुख्यमंत्री असेल. आम्ही सारख मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, असं म्हणणार नाही. तसंच ये-जादेखील करणार नाही. कायम सत्तेत राहू, असे म्हणत खासदार राऊत यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे.

आम्हाला ओला दुष्काळ, पायाभूत सुविधा अशा बाबींवर अजून काम करावे लागणार आहे. आमच्यासोबत जे जोडले गेले आहेत ते अनेक वर्ष सत्तेत होते. त्यांना राज्य चालवण्याचा मोठा अनुभव आहे. राज्याचा कारभार सुरळीत चालवण्यात कोणतीही अडचण येणार नाही. पुढील सरकार हे शिवसेनेच्या नेतृत्वातच येणार आहे. कोणी कितीही प्रयत्न केले तरीही ते बदलता येणार नाही, असे राऊत यांनी ठणकावून सांगितले.

राज्याच्या विकासात यशवंतराव चव्हाण यांचे मोलाचे योगदान होते. तसेच कॉंग्रेसच्याही अनेक नेत्यांचे मोठे योगदान आहे. महाराष्ट्राला आम्हाला पुढे न्यायचे आहे. राज्यात आतापर्यंत अनेक पक्षांचे सरकार होते. महाराष्ट्राच्या हितासाठी आम्ही एकसूत्री कार्यक्रम ठरवला आहे. सत्तेचा फॉर्म्युला शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेच ठरवतील, असेही त्यांनी नमूद केले. यापूर्वी भिन्न विचारधारांचे लोक एकत्र येऊन सरकार स्थापन केले होते. त्यानंतरही राज्याचा कारभार सुरळीत सुरू होता. गेले अनेक वर्ष उद्धव ठाकरे शेतकऱ्यांचे प्रश्न मांडत आहेत. काही पक्ष एकत्र येऊन जर शेतकऱ्यांचे प्रश्न मांडत असतील तर त्यात त्यांचच भलं आहे, असेही ते म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.