प्रसारमाध्यमांकडे वैयक्‍तिक गाऱ्हाणी मांडण्यास पोलिसांना मनाई

महासंचालकांनी काढले परिपत्रक

पुणे – खात्यात अन्याय झाला किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांशी असलेल्या वादाचे गाऱ्हाणे प्रसारमाध्यमांकडे मांडण्यास पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना मनाई करण्यात आली आहे.

या प्रकारांमुळे पोलीस दलाची प्रतिमा मलिन होत असून अशाप्रकारची वर्तणूक करणाऱ्या अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई केली जाणार आहे. अप्पर पोलीस महासंचालक (प्रशासन) संजीव कुमार सिंघल यांनी याबाबतचे परिपत्रक काढले आहे.

पोलीस दलात काम करताना अधिकारी व सहकाऱ्यांशी हेवेदावे होत असतात. अशातून वाद उद्‌भवल्याने अन्यायाविरुद्ध दाद मागण्यासाठी संबंधित अधिकारी वा कर्मचाऱ्यांकडून वरिष्ठ अधिकाऱ्याकडे तक्रार अर्ज केला जातो. या कायदेशीर मार्गाचा अवलंब करणे, हा सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना अधिकार आहे. मात्र, झालेल्या अन्यायाविरोधात वरिष्ठांकडे अर्ज न करता काही अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून या अन्यायाची थेट प्रसारमाध्यमांना माहिती दिली जाते. अशी प्रकरणे प्रसारमाध्यमांमध्ये चवीने चघळली जात असल्याने संबंधित अधिकारी व पोलीस दलाची प्रतिमा जनमानसात मलिन होते.

राज्यस्तरीय पोलीस कर्मचारी वृंद परिषद नुकतीच मुंबईत पार पडली. त्यामध्ये पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्‍तालयाचे उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांनी ही बाब या परिषदेला उपस्थित असलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली. याची पोलीस महासंचालक कार्यालयाने गंभीर दखल घेतली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.