पावसाचा सव्वाचार लाख हेक्‍टरला फटका

1557 गावांतील पावणेसहा लाख शेतकरी बाधित; अतिवृष्टीने कपाशीचे सर्वाधिक नुकसान

`अंतिम अहवालानंतरच कार्यवाही
अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या क्षेत्राचे पंचनामे सुरू आहेत. पीकनिहाय नुकसानीचा अंतिम अहवाल तयार झाल्यानंतर मदतीची पुढची कार्यवाही सुरू होणार आहे. येत्या तीन दिवसांत या नुकसानीचा अंतिम अहवाल तयार होण्याची चिन्हे आहेत.

नगर – जिल्ह्यात परतीच्या पावसाने काही भागात दमदार हजेरी लावली. या पावसामुळे फळबागासह शेतातील उभी पिके जमीनदोस्त झालेली आहे. जिल्ह्यातील 1557 गावातील पाच लाख 68 हजार 682 शेतकऱ्यांच्या सव्वाचार लाख हेक्‍टर क्षेत्रावरील पिकांचे परतीच्या पावसाने नुकसान झालेले आहे. या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम पूर्ण झालेले आहे.अतिवृष्टीमुळे सर्वाधिक नुकसान कपाशीचे झाले असून, कपाशीच्या 1 लाख हेक्‍टर क्षेत्राला अतिवृष्टीचा फटका बसल्याचा प्राथमिक अंदाज आहे. कपाशीनंतर बाजरी, सोयाबीन व मका याचे नुकसान झाले आहे.
परतीच्या पावसाने जिल्ह्यातील सर्वच भागात हजेरी लावली. त्यामुळे खरिपाची उभी पिके जमीनदोस्त झाली.

यामध्ये कांदा, बाजरी, कापूस, सोयाबीन आदी पिकांचे मोठे नुकसान झालेले आहे. त्याचबरोबर फळबागांचेही मोठे नुकसान झालेले आहे. या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश सरकारतर्फे देण्यात आलेले आहे. या नुकसानीचे पंचनामे कृषी व महसूलच्यावतीने करण्यात आलेले आहेत. जिल्ह्यातील 1557 गावातील पाच लाख 68 हजार 682 शेतकऱ्यांच्या पिकांचे पावसामुळे नुकसान झालेले असून चार लाख 21 हजार 384 हेक्‍टर क्षेत्राला फटका बसलेला आहे.

या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम पूर्ण झालेले असून त्याचा अंतिम अहवाल करण्याचे काम अंतिम टप्प्यात आलेले आहे. मागील अध्यादेशाप्रमाणेच नुकसान भरपाई देण्याचा अहवाल बनविला जात आहे. यामध्ये जिरायतसाठी 6800, बागायतीसाठी 13500 व फळबागासाठी 18 हजाराची नुकसान भरपाई हेक्‍टरी देण्यासाठी प्रस्तावित करण्यात येत आहे. नुकसानीच्या आकड्यांची जुळवाजुळव करण्यात सध्या कृषी अधिक्षक कार्यालयातील अधिकारी त्यात गुंतलेले आहेत.
जून महिन्यातील काही दिवसांच्या खंडानंतर जिल्ह्यात जूलै महिन्यात तुरळक पाऊस झाला होता. ऑगस्ट महिन्यात मात्र दमदार पाऊस झाला. त्यामुळे जिल्ह्यात साडे पाच लाख हेक्‍टर क्षेत्रावर खरीपाच्या पेरण्या झाल्या होत्या.

चांगल्या पावसामुळे यंदा 70 हजार हेक्‍टरने खरीपाचे क्षेत्र वाढले होते. सप्टेंबर महिन्यात बहुतांशी खरीपाची पीके काढण्यात आली होती. मात्र बाजरीसह मक्‍याचे पीक शेतातच होते. ऑक्‍टोबर महिन्याच्या शेवटच्या पंधरा दिवसांत पुन्हा परतीच्या पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे पीके शेतात उभी होती. काही भागात शेतकर्यांनी खरीपानंतर रब्बीची तयारी देखील सुरु केली होती. अनेक शेतकऱ्यांनी चांगल्या पावसामुळे रब्बीच्या पेरण्या देखील केल्या मात्र अवकाळी व अतिवृष्टीच्या पावसाने या पेरण्यावर पाणी फिरले. अवकाळी व अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका आत्तापर्यंत अकोले, सेवगाव, संगमनेर, पारनेर, नेवासे, श्रीगोंदे, कर्जत या तालुक्‍यांना बसला आहे. अकोले तालुक्‍यातील तब्बल 191 गावांत अतिवृष्टीमुळे भाताचे नुकसान झाले आहे.

अतिवृष्टीचा फटका सर्वाधिक कपाशीच्या पीकाला बसला आहे. यंदा चांगल्या पावसामुळे दीड लाखांहून अधिक क्षेत्रावर कपाशी घेण्यातआली होती. प्रामुख्याने शेवगाव, पाथर्डी, कर्जत, श्रीरामपूर, जामखेड या तालुक्‍यात मोठ्या प्रमाणात कपाशीची लागवड झाली होती. मात्र अतिवृष्टीमुळे कपाशीचे अतोनात नुकसान झाले. सुमारे 1 लाख हेक्‍टर क्षेत्रावरील कपाशीचे नुकसान झाले आहे. त्याखालोखाल बाजरी, सोयाबीन व मका याचे नुकसान झाले आहे.

दरम्यान, पावसामुळे जिल्ह्यात झालेल्या पिकांच्या नुकसानीचा आढावा खासदार डॉ. सुजय विखे यांनी घेतला. डॉ. विखे यांनी अधिकाऱ्यांना नुकसान भरपाईपासून एकही शेतकरी वंचित राहता कामा नये, अशा सूचना या वेळी दिल्या.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.