मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर ईडीने मोठी कारवाई केली. ‘ईडी’ने संजय राऊत यांच्या पत्नी वर्षां राऊत, गुरू आशिष कन्स्ट्रक्शन प्रा. लिमिटेडचे माजी संचालक प्रवीण राऊत आणि स्वप्ना पाटकर यांच्याशी संबंधित ११ कोटी रुपयांच्या मालमत्तांवर टाच आणली. या कारवाईवरून आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून संजय राऊत यांना चिमटा काढला आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या गुढीपाडवा मेळाव्यातील भाषणावरुन राज्यात राजकारण तापलेले असतानाच आता संजय राऊतांच्या कारवाईवरून सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने आले आहेत. अशाचत आता मनसेचे नेते अमेय खोपकर यांनी दोन्ही मुद्द्यांवरून खोचक शब्दांमध्ये टीका केली.
मशिदीच्या भोंग्यावर कारवाई करायला सांगितले होते…!
ED ने थेट राष्ट्रवादी च्या भोंग्यावरच कारवाई केली.
😝😝😝😝😝— Ameya Khopkar (@MNSAmeyaKhopkar) April 6, 2022
आज सकाळी अमेय खोपकर यांनी संजय राऊतांचा थेट उल्लेख टाळत एक ट्विट केले आहे. “मशिदींच्या भोंग्यावर कारवाई करायला सांगितले होते, ईडीने थेट राष्ट्रवादीच्या भोंग्यावरच कारवाई केली,” असे खोपकर यांनी म्हटले आहे. कालच राऊत यांच्या संपत्तीवर ईडीने टाच आणली असून त्यावर उपहासात्मक पद्धतीने खोपकर यांनी हा टोला लगावला आहे.
राज ठाकरेंनी मशिदींवरील भोंगे काढण्याचे आवाहन करत तसे न झाल्यास आम्ही मशिदींसमोर भोंग्यांवर हनुमान चालीसा लावू असे म्हटले होते. त्याचाच संदर्भ देत शिवसेनेचे प्रवक्ते असणाऱ्या संजय राऊतांना खोपकर यांनी राष्ट्रवादीचा भोंगा असे थेट उल्लेख न करता म्हटले आहे.