Chhagan Bhujbal – आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आतापासूनच सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. तसेच इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी आपली इच्छा जाहीरपणे व्यक्त करण्यासही सुरुवात केली आहे. लोकसभा निवडणुका झाल्यानंतर लागलीच विधानसभेच्या निवडणुका लागणार आहेत.
त्यामुळे तीन पक्ष एकत्र आलेल्या महायुतीलाही जागावाटपाचा तिढा लवकरात लवकर सोडवावा लागणार आहे. समसमान जागा वाटप व्हावे, अशी मागणी अजित पवार यांच्या गटाने केली आहे. त्यामुळे शिंदे गट आणि अजित पवार गट विधानसभा निवडणुकीकरता ठराविक जागांसाठी अडून बसल्याचे चित्र आहे.
अशातच अजित पवार गटाचे आमदार आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी जागावाटपासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे.
छगन भुजबळ म्हणाले, अजित पवार हे आमच्या पक्षाचे प्रमुख नेते आहेत.
त्यामुळे जागा वाटपासंदर्भात त्यांनी आपले मत स्पष्टपणे मांडले आहे. परंतु शिंदे गटाचे जितके आमदार आले आहेत, तेवढेच आमदार अजित पवार गटाचेही आहेत. त्यामुळे सारासार विचार करता त्यांच्याप्रमाणेच आम्हालाही न्याय मिळायला पाहिजे, असे छगन भुजबळ म्हणाले.
दरम्यान, आता महायुतीमध्ये जागावाटपाचा तिढा लवकर सुटणार की आणखी गुंतणार हे पाहावे लागेल. अजित पवार गटाच्या आमदारांची देवगिरी बंगल्यावर बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे जागा वाटपासंदर्भात या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.