मुंबई – वकील गुणरत्न सदावर्ते हे आपल्या सडेतोड विधानांसाठी ओळखले जातात. मग कधी सदावर्ते एक मराठा लाख मराठा अशा घोषणा दिल्यामुळे चर्चेत येतात तर कधी शरद पवार यांच्यावर टीका केल्यामुळे चर्चेत असतात. अशात आता एसटी बँकेच्या १९ पैकी १२ संचालकांनी तडकाफडकी राजीनामा दिल्याचे वृत्त समोर आले आहे. सदावर्ते यांच्यासाठी हा मोठा धक्का असल्याचे समजले जाते.एका मराठी वृत्तवाहिनीने याबाबतचे वृत्त प्रसारित केले आहे.
गुणरत्न सदावर्ते यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचे नेतृत्व केले होते.त्यानंतर सदावर्ते हे थेट एस टी महामंडळाच्या निवडणुकीत उतरले होते. सदावर्ते यांच्या पॅनलने एसटी बँकेची संचालक मंडळाची निवडणूक लढवली. या निवडणुकीत सदावर्ते यांच्या पॅनलला 19 पैकी 12 जागांवर विजय मिळाला. मात्र अंतर्गत कलहांमुळे अखेर आज १२ जणांनी राजीनामा दिला.
आज या संचालकांनी एसटी महामंडळाचे अतिरिक्त संचालक बिमनवार यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केल्याचं वृत्त एका मराठी वृत्तवाहिनीने दिले आहे.
एसटी कर्मचाऱ्यांनी दिलेले राजीनामे हा सदावर्ते यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. यामुळे सदावर्ते यांच्या एसटी महामंडळातील नेतृत्वाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. या राजीनामा सत्रामुळे एसटी महामंडळात एकच खळबळ उडाली आहे.