नवी दिल्ली – राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत आम आदमी पक्षाने विरोधी आघाडीचे संयुक्त उमेदवार यशवंत सिन्हा यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षाचे नेते व राज्यसभा खासदार संजयसिंह यांनी आज पक्षाने घेतलेल्या निर्णयाची माहिती दिली. आम्ही द्रौपदी मुर्मूचा आदर करतो पण आम आदमी पार्टी विरोधी उमेदवार यशवंत सिन्हा यांना पाठिंबा देईल, असे सिंह म्हणाले.
याविषयी निर्णय घेण्यासाठी आम आदमी पक्षाच्या राजकीय सल्लागार समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यात एकमताने हा निर्णय झाला. या बैठकीला आपचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया, संजयसिंह, पंजाबचे खासदार राघव चढ्ढा, आमदार आतिशी आणि अन्य सदस्य उपस्थित होते. राष्ट्रपतिपदासाठी उद्या सोमवारी मतदान होणार आहे.
दिल्ली आणि पंजाब या दोन राज्यांमध्ये सरकार असलेली आम आदमी पार्टी ही एकमेव बिगर-भाजप, बिगर कॉंग्रेसी संघटना आहे. या पक्षाचे दहा राज्यसभा सदस्य आहेत. पक्षाकडे पंजाबात 92 आणि दिल्लीत 62 आमदार असून गोव्यातही या पक्षाचे दोन आमदार आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे एकूण 156 आमदारांचे संख्याबळ आहे. या निर्णयामुळे ही सगळी एकगठ्ठा मते यशवंत सिन्हा यांना मिळणार असल्याने ते कडवी लढत देतील, असे मानले जात आहे. संख्याबळाच्या तुलनेत एनडीएच्या उमेदवार मुर्मू यांचे पारडे जड आहे.