जळगाव – गिरीश महाजन यांची स्मरणशक्ती कमी झाली आहे. गिरीश महाजनांनी त्यांच्या मुलाबाळांची शपथ घालून सांगावे निधीसाठी माझे पाय धरले की नाही?, असा खळबळजनक प्रश्न एकनाथ खडसेंनी उपस्थित केला आहे. तर आपली लायकी आपणच ओळखायची असते दुसऱ्यांनी सांगायची नसते, अशी टीकाही खडसेंनी केली.
माझ्या मागे लांगूलचालन लावणारे गिरीश महाजन माझ्या आशिर्वादाने मोठे झाले. देवेंद्र फडणवीसांची हाजी हाजी करून महाजनांना नेतृत्व मिळाले. आतापर्यंत माझी हाजी हाजी करणारा महाजन याचं स्वत:चं नेतृत्व काय? अशी टीका देखील एकनाथ खडसेंनी केली आहे.
गिरीश महाजन विरूद्ध राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्यातील शाब्दिक युद्धाने जळगावातील राजकारण ढवळून निघत आहे. दोन्ही नेत्यांकडूंन आरोपांच्या फैरी झाडल्या जात असताना एकनाथ खडसेंनी महाजनांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.एकनाथ खडसेंची लायकी नसताना त्यांना भाजपमध्ये पदे मिळाली, अशी घणाघाती टीका गिरीश महाजन यांनी केली होती. या टीकेला प्रत्युत्तर देताना एकनाथ खडसेंनी गिरीश महाजनांबद्दलची धक्कादायक माहिती उघड केली आहे.