साहयकडा ऍडव्हेंचर प्रतिष्ठानकडून केले होते ट्रेकिंगचे आयोजन
तळेगाव ढमढेरे -गिर्यारोहकांच्या साहसाला आव्हान देणारा महाराष्ट्रातील सर्वांत अवघड असलेला 235 फूट उंच वजीर सुळका पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरातील 25 गिर्यारोहकांनी खडतर प्रयत्नांनंतर सर केला. साहयकडा ऍडव्हेंचर प्रतिष्ठानकडून या ट्रेकिंगचे आयोजन करण्यात आले होते.
सह्याद्री पूजन करून प्रस्तारोहण मोहीम सुरू करण्यात आली. ठाणे जिल्ह्यातील माहुली किल्ल्याजवळ वजीर सुळकासर करण्यासाठी गिर्यारोहक बाबाजी चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन करण्यात आले होते. लीड क्लायम्बिंगसाठी श्रीराम पवळे यांनी महत्त्वाची धुरा हाती घेतली होती.
यावेळी सुळका चढताना मध्यभागी असलेले तब्बल 100 ओव्हरहॅंग करत सचिन पाटील, किरण पोतले, सागर मांडेकर, निखिल पोखरकर, धनराज मोझे, किरण दौंडकर, शिवाजी पोतले, अशोक दिघे, राहुल जाधव, आदेश चौधरी, प्रणव हरगुडे, आदेश चौधरी, राहुल खोराटे, सुरेश अमोल दिवेकर, प्रताप पाटील, श्रीकांत नागवडे, पवनकुमार शिवले यांच्यासोबत प्रगती चौधरी, शृतिका खांदवे, ज्ञानेश्वरी गाडेकर या महिला गिर्यारोहकांनी हिंमत दाखवून किल्ला सर केला.
मोहीम सुरक्षित पडली पार
एकाच कुटुंबातील आई-वडील आणि दोन मुलांनी सुळका सर करण्याची किमया साधली. वजीर वरून व्हॅली क्रॉसिंग करत उतरलेला विराज पहिलाच गिर्यारोहक असावा. त्यानंतर सर्वांनी सुळका उतरताना तब्बल 200 फूट ओव्हरहॅंग रॅपलिंगचा थरार अनुभवला. सुप्रसिद्ध वजीर सुळका सर करण्याचे सर्वांचे स्वप्न पूर्ण झाले. संपूर्ण मोहीम सुरक्षित पार पडली. त्यासाठी घेण्यात आलेल्या सुरक्षित “आरोहण टेनिंग आणि ओव्हरहॅंग झुमरिंग’चा खूप फायदा झाला.