“होम क्वारंटाइन’साठी आरोग्य विभागाच्या जोरदार हालचाली
रेडा -सध्या करोनाच्या वायरस प्रादुर्भावाने लोकांची झोप उडाली आहे. आता या रोगाची लागण ग्रामीण भागातही झाली आहे. जिल्ह्यातील वेल्हे गावात आणि शिरूर तालुक्यातील सणसवाडी गावात पसरला आहे. त्यामुळे गावागावांत खबरदारी घेत असून अनेक गावांनी आपल्या सीमाही बंद केल्या आहेत. त्याचप्रमाणे इंदापूर तालुक्यातील प्रशासनही उपाययोजना करण्यासाठी आटोकाट प्रयत्न करीत आहेत.
दरम्यान, तालुक्याच्या बाहेरून घरी परतलेल्या जवळपास 5 हजार नागरिकांवर आरोग्य विभागाची पाळत ठेवून आहेत, तरीही नागरिकांनी कृपा करून घराबाहेर पडू नका, असे आवाहन प्रशासनासह सर्व स्तरातून करण्यात येत आहे.
इंदापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विजयकुमार परीट म्हणाले की, इंदापूर तालुक्यातील जवळपास अणि 103 ग्रामपंचायतींचा आढावा घेतलेला आहे.
यामध्ये 5 हजार संख्येपेक्षा अधिक पुणे व मुंबई येथून गावाकडे आलेल्या नागरिकांची संख्या आहे. या सर्व नागरिकांना “होम क्वारंटाइन करण्यासाठी यंत्रणेच्या आरोग्य विभागाच्या हालचाली सुरू आहेत.
यामध्ये या सर्व नागरिकांची “ट्रॅव्हल हिस्ट्री’ घेण्याचे काम सुरू आहे. तसेच यांच्यावर उपचारासाठी डॉक्टर रजिस्टर करायचे आहेत. जर ते “होम क्वारंटाइन’साठी तयार नसले तर त्यांना जवळपास तालुक्यातील 979 शाळेच्या वर्गखोल्या आम्ही उपलब्ध केले आहेत. जर यामधले नागरिक पॉझिटिव्ह सापडले तर त्यांना पुण्यातील नायडू हॉस्पिटलमध्ये पाठवले जाईल.