मुंबई: भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपला पुन्हा एकदा घरचा आहेर दिला आहे. एकनाथ खडसे यांनी भाजपमध्ये असून सुद्धा अनकेवेळा भाजपच्याच व्यसपीठावर आपली नाराजी व्यक्त केली आहे. एका व्रुत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये एकनाथ खडसे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केले.
सध्या भाजपमध्ये उमेदवारांची जोरात आयात सुरु आहे. अश्या अनेक नेत्यांना भाजपमध्ये प्रवेश मिळाला. ज्यांच्यावर भाजपने थेटपणे आरोप केले होते. याबाबत बोलताना खडसे म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे वॉशिंग पावडर आहे. पक्षात आलेल्या नेत्यांना आम्ही धुवून देतो. त्यानंतर त्यांना क्लिनचिट दिली जाते. मग ते कामाला लागतात. तसेच आमचा पक्ष पार्टी विथ डिफरेन्स आहे, असा चिमटा देखील त्यांनी मुख्यमंत्र्यांना काढला.
राष्ट्रवादी काँग्रेसने देखील संधी साधत भाजपवर निशाणा साधला आहे. आपल्या अधिकृत फेसबुक पेजवर एक व्हिडिओ शेअर करत, शालजोड्यातून कशी हाणतात याचे उत्तम उदाहरण भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी दाखवून दिलेय. मुख्यमंत्र्यांच्या पारदर्शक कारभाराची पोलखोल करण्यासाठी भाजपच्या एकनाथाचे हे बोल पुरेसे असल्याचे राष्ट्रवादीने म्हटले आहे.