पिंपरी – विधानसभा निवडणुकीसाठी शहरातील सेलिब्रिटी, कलाकार आणि उद्योजकांनी सोमवारी (दि. 21) स्वत: मतदानाचा हक्क बजावला. तसेच, नागरिकांना देखील मतदान करण्याचे आवाहन केले.
विधानसभा निवडणुकांसाठी सकाळपासूनच मतदान करण्यासाठी विविध मतदान केंद्रांवर नागरिकांनी तुरळक गर्दी केली होती. पावसाने देखील थोडा वेळ हजेरी लावली. दरम्यान, नागरिकांबरोबरच सेलिब्रिटी, कलाकार आणि उद्योजकांनी आपल्या व्यस्त कार्यक्रमातून वेळ काढत आज मतदान करण्याचा हक्क बजावला. पार्श्वगायिका सावनी रवींद्र यांनी चिंचवड येथील माटे शाळेमध्ये सायंकाळी पावणे सहाच्या सुमारास मतदान केले.
श्रीमती गोदावरी हिंदी विद्यालयात उद्योजक मधुर बजाज यांनी दुपारी पावणेदोनच्या सुमारास मतदानाचा हक्क बजावला. तर, सकाळच्या सत्रात 11 वाजता उद्योजक राजीव बजाज यांनी संबंधित केंद्रामध्येच मतदान केले. अभिनेत्री प्रियांका यादव यांनी चिंचवडगाव येथील श्री फत्तेचंद जैन विद्यालय येथील मतदान केंद्रात सकाळी 8:30 च्या सुमारास कुटुंबासह मतदान करण्याचा हक्क बजावला. नाट्यअभिनेते डॉ. संजीवकुमार पाटील यांनी प्राधिकरण येथील कॅम्प एज्युकेशन शाळेमध्ये सकाळी नऊच्या सुमारास पत्नीसह मतदान केले. संवादिनी वादक संतोष घंटे यांनी मोहननगर येथील महापालिका शाळेत दुपारी साडेबारा ते एकच्या दरम्यान मतदान केले.
चित्रपटाचे प्रमोशन थांबवून मतदान
“नागरिकांनी फक्त फोटो काढून इन्स्टाग्राम किंवा फेसबुकवर सेल्फी टाकण्यासाठी मतदान करायला नको. प्रत्येक मत हे मौल्यवान आहे. उमेदवाराची पार्श्वभूमी तपासून विचारपूर्वक मतदान व्हायला हवे. धर्म आणि जातीवर आधारित मतदान न करता उमेदवाराची कार्यक्षमता पाहून मतदान व्हायला हवे,” असे मत अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी सोमवारी व्यक्त केले. निगडी-प्राधिकरण येथील ज्ञानप्रबोधिनी विद्यालयात सकाळी साडेदहाच्या सुमारास त्यांनी मतदान केले. त्यांच्या नव्याने प्रदर्शित होत असलेल्या “हिरकणी’ या नवीन चित्रपटाचे प्रमोशन थांबवून त्या मतदानासाठी आल्या होत्या.
दिवसाची सुरुवात मतदानाने
अभिनेत्री आशा नेगी यांनी वाल्हेकरवाडी येथील महापालिका शाळेत मतदान केले. त्या म्हणाल्या, “”मी आज दिवसाची सुरुवात मतदान करूनच केली. मतदान करताना उमेदवार कोण, पक्ष कोणता असे मुद्दे अनेक असले तरी चांगला विकास होण्यासाठी आपण योग्य उमेदवार निवडणे गरजेचे आहे. ते कर्तव्य प्रत्येकाने बजावले पाहिजे.”
कर्तव्य समजून मतदान
कथ्थक नर्तक डॉ. नंदकिशोर कपोते यांनी निगडी-यमुनानगर येथील महापालिकेच्या माध्यमिक कन्या शाळेमध्ये मतदानाचा हक्क बजावला. ते म्हणाले, “”राज्यघटनेने प्रत्येकाला मतदानाचा अधिकार दिलेला आहे. मात्र, कर्तव्य समजून आपण मतदान केले पाहिजे. उमेदवार निवडताना पुरेशी काळजी घेतल्यास शहराच्या आणि राज्याच्या विकासाला हातभार लागेल.”