भोसरीत मतदानाची टक्केवारी घटली…

पिंपरी – मतदान जनजागृती, पावसाने दिलेली उघडीप, मतदारांना घराबाहेर काढण्यासाठी उमेदवारांनी केलेली धावपळ याचा फारसा परिणाम भोसरीतील मतदानावर दिसून आला नाही. भोसरीतील 411 मतदान केंद्रांवर दिवसभरात सुमारे 59.30 टक्के मतदान झाले. मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावत 12 उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद केले आहे. सात ठिकाणी तांत्रिक बिघाडामुळे “व्हीव्हीपॅट’ मशीन बदलण्याच्या घटना वगळता सर्व मतदान केंद्रांवर शांततेत मतदान पार पडले. गतवर्षीच्या तुलनेत एक टक्‍क्‍याने मतदान घसरले.

भोसरी विधानसभा मतदार संघासाठी भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार महेश लांडगे व राष्ट्रवादी पुरस्कृत उमेदवार माजी आमदार विलास लांडे यांच्यासह 12 उमेदवारांनी दंड थोपटले होते. 4 लाख 41 हजार 125 मतदार भोसरी मतदार संघात आहेत. यामध्ये एक लाख 99 हजार 493 स्त्री आणि दोन लाख 41 हजार 601 पुरुष आणि इतर 53 मतदारांचा समावेश आहे. निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी 2 हजार 260 निवडणूक कर्मचाऱ्यांसह पोलीस तसेच राज्य राखीव दलाचे जवान तैनात होते. एक सखी मतदान केंद्रासह 411 मतदान केंद्रांवर मतदान घेण्यात आले. 494 कंट्रोल युनिट, 494 बॅलेट युनिट आणि 535 व्हीव्हीपॅटचा वापर करण्यात आला. अभिरुप मतदान (मॉकपोल) घेतल्यानंतर सकाळी सात वाजता मतदानाला सुरूवात झाली. दुपारनंतर पाऊस येण्याच्या धास्तीने नागरिकांनी सकाळीच मतदान उरकून घेतल्याचे मतदान केंद्रांवरील रांगांमधून पहायला मिळाले.

मतदान सुरु झाल्यानंतर पहिल्या दोन तासात 5.11 टक्के मतदान झाले. यामध्ये 15 हजार 218 पुरुष तर 7 हजार 310 महिला अशा एकूण 22 हजार 528 मतदारांचा समावेश होता. त्यानंतर मतदान केंद्रांवर रांगा लागल्याचे पहायला मिळाले. सकाळी नऊ ते अकरा या वेळेत 15.11 टक्‍के मतदान झाले. अकरा ते दुपारी एक या वेळेत 28.23 टक्के मतदान झाले. दुपारच्या टप्प्यातही मतदानाचा जोर पहायला मिळाला. दुपारी एक ते तीन या वेळेत 40.23 टक्के मतदान झाले. सायंकाळी पाच पर्यंत मतदानाची टक्केवारी 52.12 टक्‍क्‍यांवर पोहचली.

शहरात उदासीनता, उपनगरात उत्साह
भोसरी विधानसभा मतदार संघात मोशी, चऱ्होली, चिखली, दिघी, तळवडे या उपनगरी (ग्रामीण) भागात मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद तर शहरी भागात मतदानाची उदासिनता पहायला मिळाली. तर दुसरीकडे शहरातील झोपडपट्टीबहुल भागात मतदानाची घटीका संपुष्टात येण्याच्या मार्गावर असताना अचानक गर्दी वाढली. उमेदवारांचा पहिल्या सत्रात स्वत:सह कुटुंबीयांचे मतदान करण्याकडे कल होता. त्यानंतर वेगवेगळ्या मतदान केंद्रांबाहेर मतदारांना अभिवादन करण्यासाठी ते रवाना झाले. मतदारांना घराबाहेर काढण्यासाठी उमेदवारांच्या कार्यकर्त्यांची दिवसभर धावपळ सुरु होती.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)