नवी दिल्ली – निवडणूक निकाल जाहीर झालेल्या 3 पैकी 2 ठिकाणी भाजपला पराभव पत्करावा लागला. तसे असले तरी, मिळालेल्या मतांचा टक्का भाजपसाठी दिलासादायी आहे.
दिल्ली पालिका निवडणुकीत आपने बाजी मारली. तिथे पराभूत होऊनही भाजपच्या मतांमध्ये 3 टक्क्यांनी वाढ झाली आहे. मागील पालिका निवडणुकांत भाजपला 36.08 टक्के मते मिळाली होती. यावेळी ते प्रमाण 39.09 टक्के इतके नोंदले गेले.
बालेकिल्ला असणाऱ्या गुजरातमध्ये यावेळी भाजपने विक्रमी विजय मिळवला. त्या पक्षाच्या वाट्याला यावेळी सुमारे 53 टक्के मते आली. मागील वेळी भाजपला 49 टक्के मते मिळाली होती.
यावेळी कॉंग्रेसने धक्का दिल्याने भाजपला हिमाचल प्रदेशची सत्ता गमवावी लागली. पण, त्या राज्यात दोन्ही पक्षांना मिळालेल्या मतांमध्ये फारसे अंतर नाही. हिमाचलमध्ये कॉंग्रेसच्या वाट्याला 43.90 टक्के मते आली. भाजपनेही 43 टक्के मते मिळवली. मागील वेळी भाजपने 48.80 टक्के, तर कॉंग्रेसने 41.70 टक्के मते मिळवली होती.