बेळगाव :– कर्नाटक-महाराष्ट्र सीमावादावरून भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्याशी बोलणे झाले आहे. कर्नाटक महाराष्ट्राला एक इंचही जागा देणार नाही. तसेच, याप्रकरणात कोणतीही तडजोड करणार नाही, असे म्हणत कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी आज पुन्हा महाराष्ट्राला डिवचले आहे. यावरून बोम्मई हे आडमुठेपणाची भूमिका घेतल्याचे दिसत आहे.
बसवराज बोम्मई यांनी सांगली आणि सोलापुरातील काही गावांवर दावा सांगितल्यानंतर कर्नाटक-महाराष्ट्र सीमावाद पेटला.बोम्मई यांच्या दाव्यानंतर महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली. त्यातच महाराष्ट्रातील ट्रकवर बेळगावात हल्ला करण्यात आला होता. यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट गृहमंत्री अमित शहा यांना फोन करून चर्चा केली होती.
याबाबत माध्यम प्रतिनिधींनी बोम्मईंना विचारले असता ते संतापले. बोम्मई म्हणाले, कर्नाटक-महाराष्ट्र सीमावादावरून जेपी नड्डा यांच्याशी बोलणे झाले आहे. कर्नाटक महाराष्ट्राला एक इंचही जागा देणार नाही. या प्रकरणात कोणतीही तडजोड करणार नाही. तसेच अमित शहांबरोबर सीमाप्रश्नावरून कोणतीही चर्चा झाली नसल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.
तसेच नड्डा यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना फोन करून शांतता राखण्यास सांगितले आहे. महाराष्ट्रात असलेल्या कन्नडिगांचे संरक्षण करण्याबाबत सर्व खबरदारी घेण्यात आली आहे. याबाबत महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक आणि मुख्य सचिव यांच्याशी चर्चा केली आहे, असेही बोम्मई यांनी स्पष्ट केले.