“भाजपसोडून कोणालाही मतदान करा” – ५ राज्यांतील निवडणुकांमध्ये शेतकरी भाजपच्या अडचणी वाढवणार?

नवी दिल्ली – केंद्र सरकारने नव्याने लागू केलेले कृषी कायदे मागे घेण्यात यावेत या प्रमुख मागणीसह शेतकरी गेल्या १०५ दिवसांपासून दिल्लीच्या सीमांवर ठिय्या मांडून बसले आहेत. हा तिढा सोडवण्यासाठी  सरकार व आंदोलक शेतकऱ्यांमध्ये चर्चेच्या अनेक फेऱ्या पार पडल्या. यानंतर सरकारने कृषी कायदे तीन वर्षांसाठी मागे घेण्याचा पर्याय शेतकऱ्यांसमोर ठेवला, मात्र याप्रकरणी अद्यापतरी कोणताही तोडगा निघालेला नाही.

सर्वोच्च न्यायालयाने नव्या कृषी कायद्यांचा अभ्यास करण्यासाठी एक समिती नेमली असून समितीचा अहवाल येईपर्यंत नव्या कृषी कायद्यांना स्थगिती देण्यात आली आहे. असं असलं तरी शेतकरी मात्र आपल्या मागण्यांवर ठाम असून त्यांनी मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन मागे घेण्यास नकार दिला आहे.

अशातच आता शेतकरी नेत्यांनी केंद्रातील भाजप सरकारवर दबाव टाकण्यासाठी मोठा निर्णय घेतलाय. शेतकरी नेते बलबीर सिंग राजेवाल यांनी याबाबत माहिती देताना, आंदोलक शेतकरी नेते निवडणुका होऊ घातलेल्या ५ राज्यांमध्ये जाऊन भाजपला मतदान करू नका असं आवाहन मतदारांना करणार असल्याचं सांगितलं.

दरम्यान, येत्या २७ मार्चपासून आसाम, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ आणि पुडुचेरी या पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. या राज्यांमधील निवडणूक कार्यक्रमासंदर्भात निवडणूक आयोगातर्फे अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. महिनाभराहून अधिक काळ निवडणूक घेण्यात येणार असून त्याचे निकाल २ मे रोजी जाहीर करण्यात येतील.

भाजपसह सर्वच प्रमुख पक्षांनी निवडणुका होऊ घातलेल्या राज्यांमध्ये जोरदार तयारी सुरु केली आहे. अशातच आता आंदोलक शेतकरी नेते भाजपविरोधात मैदानात उतरणार असून ‘भाजप’खेरीज इतर कोणालाही मतदान करा असे आवाहन करणार असल्याने भाजपसाठी ही डोकेदुखी ठरते की काय? असा प्रश्न चर्चिला जातोय.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.