IPL 2024, KKR vs RCB : आरसीबीचा स्टार फलंदाज विराट कोहलीने कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध (शुक्रवार,दि.29 मार्च) खेळल्या जाणाऱ्या सामन्यात एक मोठा विक्रम केला आहे. तो आरसीबीसाठी सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज ठरला आहे. या बाबतीत त्याने ख्रिस गेल (239) आणि एबी डिव्हिलियर्स (238) यांना मागे टाकले आहे.
कोहलीच्या नावावर आता 241* षटकार आहेत. तीन षटकार मारत त्याने ही कामगिरी केली. या सामन्यात विराट कोहली दमदार फॉर्ममध्ये दिसत आहे. त्याने आयपीएलमधील 52 वे अर्धशतक झळकावले आहे. त्याने 36 चेंडूत 50 धावा पूर्ण केल्या. त्याचवेळी कोलकात्याविरुद्ध त्याने 59 चेंडूत 83 धावांची नाबाद खेळी केली. त्याच्या बॅटमधून 4 चौकार आणि 4 षटकार आले.
आयपीएलमध्ये एका संघासाठी सर्वाधिक षटकार
1. विराट कोहली (आरसीबी) 240 सामने 241 षटकार
2. ख्रिस गेल (आरसीबी) 85 सामने 239 षटकार
3. एबी डीव्हिलियर्स (आरसीबी) 156 सामने 238 षटकार
4. किरॉन पोलार्ड (मुंबई इंडियन्स) 189 सामने 223 षटकार
5. रोहित शर्मा (मुंबई इंडियन्स) 200 सामने 210 षटकार
6. महेंद्रसिंग धोनी (चेन्नई सुपर किंग्ज) 222 सामने 209 षटकार
आयपीएलच्या इतिहासात केवळ सहा खेळाडू आहेत ज्यांनी या स्पर्धेत कोणत्याही एका संघासाठी 200 हून अधिक षटकार मारले आहेत. या यादीत फक्त गेल, डिव्हिलियर्स, कोहली, किरॉन पोलार्ड, रोहित शर्मा आणि महेंद्रसिंग धोनी यांचा समावेश आहे. त्याचबरोबर कोहलीने कोलकाताविरुद्ध 3 षटकार मारून इतिहास रचला आहे. आता तो एका संघाकडून खेळताना 240 षटकार मारणारा जगातील एकमेव फलंदाज बनला आहे.
विराट कोहलीने एमएस धोनीला टाकले मागे…
आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक षटकार मारण्याच्या बाबतीत विराट कोहलीने आता टॉप-4 मध्ये प्रवेश केला आहे. लीगच्या इतिहासात सर्वाधिक षटकार मारण्याच्या बाबतीत त्याने एमएस धोनीला मागे टाकले आहे. धोनीने इंडियन प्रीमियर लीगमध्ये आतापर्यंत 239 षटकार मारले आहेत.