गणेशोत्सवात कायद्याचे उल्लंघन केल्यास गुन्हे दाखल होणार

वाठार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 33 गावांमध्ये “एक गाव एक गणपती’चा निर्णय
वाठार स्टेशन (प्रतिनिधी) –
करोनाच्या पार्श्‍वभूमीवर सामाजिक जाणीवेतून “एक गाव एक गणपती’ ही संकल्पना राबवावी. कायदा, सुव्यवस्थेचे उल्लंघन केल्यास कारवाई केली जाईल. शासनाच्या नियमांचे पालन करून गणेशोत्सव साधेपणाने साजरा करावा, असे आवाहन वाठार स्टेशन पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्निल घोंगडे यांनी केले होते. या आवाहनास प्रतिसाद देत 33 गावांमधील सार्वजनिक मंडळे व गणेशभक्‍तांनी “एक गाव एक गणपती’चा निर्णय घेतला.

वाठार स्टेशन येथील मंगल कार्यालयात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे व शांतता समित्यांची बैठक नुकतीच घेण्यात आली. पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 48 गावांचे सरपंच, मंडळांचे पदाधिकारी,पोलीस पाटील, पत्रकार व कार्यकर्ते उपस्थित होते. सध्या जिल्ह्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने “एक गाव एक गणपती’ उपक्रम राबवून प्रशासनाला सहकार्य करावे. करोना व लॉकडाऊनमुळे अनेक व्यवसाय ठप्प आहे. त्यामुळे उत्सवासाठी कोणालाही वर्गणीची सक्ती करू नये. शासनाच्या नियमांचे कटाक्षाने पालन करावे. श्रींची मूर्ती चार फुटांचीच पाहिजे. मंडळांनी करोनाविषयी जनजागृती करावी, सार्वजनिक ठिकाणी गैरप्रकार घडू नयेत याची दक्षता घ्यावी. समाजोपयोगी उपक्रम राबवावेत. पोलिसांकडून मंडळांना सहकार्य राहील; परंतु कायद्याचे उल्लंघन केल्यास मंडळांवर गुन्हे दाखल केले जातील, असे घोंगडे यांनी स्पष्ट केले. सरपंच यादव व धुमाळ सरांनी मार्गदर्शन केले.

उर्वरित गावेही उपक्रमात सहभागी होतील
उर्वरित गावेही श्रींची प्रतिष्ठापना होण्यापूर्वी यात सहभागी होण्याची शक्‍यता आहे. वाघोली, पिंपोडे खुर्द,भाडळे, देऊर, तडवळे, अनपटवाडी, अरबवाडी, चिलेवाडी अशा गावाचा नव्याने समावेश असून इतर गावांनीही त्यांचा आदर्श घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्‍त करण्यात आली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.