फलटण (प्रतिनिधी) – बिरदेवनगर (जाधववाडी), ता. फलटण येथील करोनाबाधिताच्या हाय रिस्क संपर्कातील एकाने करोना चाचणी करण्यास नकार दिल्याने त्याच्यावर फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जगभरात करोनाने थैमान घातले असून देशातही बाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध नियम, उपाययोजनांसमवेत बाधिताच्या अतिनिकटच्या संपर्कातील लोकांची तपासणी करण्यात येत आहे. बिरदेवनगर (जाधववाडी) येथील एका कुटुंबातील व्यक्तींनी हाय रिस्कमध्ये असूनही करोना चाचणीस नकार दिला. बिरदेवनगर येथे काही दिवसांपूर्वी करोनाचा रुग्ण आढळल्याने त्याच्या निकट संपर्कातील व्यक्तींच्या चाचण्या करण्यात आल्या. एका घरातील आठ सदस्यांना करोना चाचण्यांसाठी वारंवार बोलावण्यात आले; परंतु प्रत्येक वेळी त्यांनी टाळाटाळ केली.
हे लोक चाचणीसाठी हॉस्पिटलमध्ये जाणीवपूर्वक येत नसल्याने डॉक्टर, महसूल विभाग व पोलीस कर्मचाऱ्यांचे पथक गुरुवारी (दि. 20) दुपारी तीन वाजता त्यांच्या घरी गेले असता, घरातील एकाने त्यांच्याशी वाद घालून घराचा दरवाजा आतून लावून घेतला. त्यामुळे शासकीय कामात व्यत्यय आणणे, करोनाचा प्रसार होण्यास कारणीभूत ठरण्याची शक्यता, डॉक्टर व सक्षम अधिकाऱ्याच्या आदेशाचे पालन न केल्याने संबंधितावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस नाईक गिरी तपास करत आहेत.