शिमला – बॉलीवूड अभिनेत्री कंगना राणावत हिला भाजपने उमेदवारी दिल्याने हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभा मतदारसंघ लक्षवेधी ठरला आहे. मात्र, त्या जागेवर कॉंग्रेसने अद्याप उमेदवार दिलेला नाही. आता हिमाचलचे मंत्री विक्रमादित्य सिंह यांना कॉंग्रेसकडून उमेदवारी मिळण्याचे संकेत मिळू लागले आहेत.
मावळत्या लोकसभेत मंडीचे प्रतिनिधित्व कॉंग्रेस प्रदेशाध्यक्षा प्रतिभा सिंह करत आहेत. मात्र, त्यांनी काही दिवसांपूर्वी पुन्हा निवडणूक लढवण्यास नकार दर्शवला.
त्यानंतर भाजपने कंगनाला उमेदवारी जाहीर केल्यावर प्रतिभा यांनी भूमिका बदलली. कॉंग्रेस श्रेष्ठींनी आदेश दिल्यास लढण्यास तयार असल्याचे त्यांनी सूचित केले.
पण, त्यांनीच आता पुत्र विक्रमादित्य यांचे नाव पुढे केल्याचे समजते. दुसऱ्यांदा आमदार बनलेले विक्रमादित्य यांना मोठा राजकीय वारसा लाभला आहे. माजी मुख्यमंत्री दिवंगत विरभद्र सिंह यांचे ते पुत्र.
याआधी त्यांनी युवक कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची धुरा सांभाळली. त्यामुळे बहुसंख्य तरूणांशी ते जोडले गेले आहेत. त्याशिवाय, चांगले वक्ते म्हणून ते ओळखले जातात.
कंगनासारख्या तरूण अभिनेत्रीचा मुकाबला करण्यासाठी तरूण उमेदवारालाच संधी देण्याचा विचार कॉंग्रेसमधून पुढे आला आहे. त्यातून ३५ वर्षीय विक्रमादित्य यांचे नाव उमेदवारीसाठी आघाडीवर असल्याचे समजते.
त्यामुळे मंडीत कंगना विरूद्ध विक्रमादित्य असा रंगतदार मुकाबला पाहावयास मिळण्याची चिन्हे आहेत. त्यांच्यातील लढत संपूर्ण देशाची लक्ष वेधून घेणारी ठरेल.