विखे-औटी संघर्ष वाढणार!

खासदार सुजय विखेंच्या आजच्या पारनेर दौऱ्यावर सेनेचा बहिष्कार

नगर – लोकसभेच्या निवडणुकीत प्रामाणिकपणे काम करूनही खासदार सुजय विखे यांच्या कार्यकर्त्यांनी विधानसभेला मदत केला नसल्याचा राग शिवसेनेच्या अर्थात विधानसभेचे माजी उपसभापती विजय औटी यांच्या कार्यकर्त्यांच्या मनात आहे.त्यामुळेच उद्या, दि.6 सुजय विखे पारनेर तालुक्‍याच्या दौऱ्यावर असताना या दौऱ्यात कोणत्याही शिवसैनिकांनी सहभागी होवू नये, या दौऱ्याशी शिवसेनेचा कोणताही संबंध नाही असा फतवाच शिवसेनेचे तालुकाप्रमुख विकास रोहोकले यांनी काढला आहे. यामुळे पुढील काळात विखे-औटी राजकीय संघर्ष वाढणार हे उघड आहे.

मागील काही काळात विखे व औटी यांच्यात कायम सख्य राहिले. मात्र सुजय विखे व विजय औटी यांच्या दोघांचेही स्वभाव आक्रमक व हम करेसो… असल्याने यांचे पटले नाही.
लोकसभा निवडणुकीच्या आधी विखे यांनी औटींना इंजेक्‍शन टोचण्याची भाषा केली. मात्र भाजपचे कमळ त्यांच्या हाती आल्यानंतर औटी यांची मदत घेण्यावाचून विखे यांना पर्याय राहिला नाही. लोकसभेत तुझ्या गळा माझ्या गळा करत विखे-औटी सोबत राहिले. तरी विखेंना पारनेरमधून अपेक्षित मताधिक्‍य मिळाले नाही.

त्यामुळे तो औटी यांच्याबद्दलचा राग त्यांच्या मनात कायम राहिला. त्यातून विधानसभेला विखे मनाने औटी यांच्यासाठी प्रचार करताना दिसले नाही. विखे सोबत असते तरी औटी यांच्याबद्दल जनतेच्या मनात रोष असल्याने त्यांना निलेश लंके यांनी मोठ्या मताधिक्‍क्‍याने मात दिली.
विखे यांचे कार्येकर्ते औटी यांचा प्रचार करत नसल्याची बाब औटी यांच्या पत्नी जयश्रीताई औटी यांनी सुजय विखे यांच्या निर्दशनास आणून दिली. त्यावेळी विखे यांनी मी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांना शब्द दिला आहे.

तसेच सेना-भाजपची युती आहे असे आश्‍वासीत करत माझा कार्यकर्ता कुठेही वेगळा विचार करणार नाही असे आश्‍वासन दिले होते. मात्र विखे यांचे कट्टर समर्थक माजी आमदार नंदकुमार झावरे यांनी शेवटच्या टप्प्यात निलेश लंके यांचे घड्याळ चालविण्याचा उघड आदेश कार्यकर्त्यांना दिला.
औटी यांना सुमारे 60 हजार मताधिक्‍क्‍यांनी स्वीकारावा लागलेला पराभव त्यांना व औटी यांच्या कार्यकर्त्यांच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. त्यामुळेच खासदार सुजय विखे बुधवारी पारनेर तालुक्‍याच्या दौऱ्यावर येत असताना शिवसेनेचा या दौऱ्याशी काही संबंध नसल्याचा निर्वाळा देण्याची वेळ शिवसेनेच्या तालुकाध्यक्षांवर आली आहे. यातून विखे-औटी यांच्यात पुढील काळात उघड राजकीय संघर्ष होणार हे दिसत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.