महापौरांना पुन्हा मुदतवाढ?

नवीन सरकार स्थापनेनंतरच लॉटरी निघण्याची शक्‍यता

पुणे – महापौरपदाला पुन्हा एकदा मुदतवाढ मिळणार असून, नवीन सरकार स्थापनेनंतरच महापौरपदाची लॉटरी निघण्याची शक्‍यता आहे. ही मुदत सध्या 21 नोव्हेंबरपर्यंत आहे.

पुणे महापालिकेसह राज्यातील 26 महापालिकांच्या महापौरांना विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लक्षात घेऊन तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली होती. त्यानुसार ती 21 नोव्हेंबरला संपणार आहे. या पदाची आरक्षण सोडत काढण्यासाठी राज्यात सरकार स्थापन होणे आवश्‍यक आहे. परंतु, अद्यापही सत्तास्थापनेचा पेच सुटला नाही. अशा परिस्थितीत ही लॉटरीही पुढे जाण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे.

सध्या असलेल्या महापौर मुक्‍ता टिळक यांची मुदत 15 सप्टेंबर रोजी संपली होती. मात्र, विधानसभा निवडणुकांमुळे राज्य सरकारने त्यांना तीन महिन्यांची मुदतवाढ दिली होती. सद्य:स्थितीत सरकार स्थापनेचा पेच पाहता ही मुदत आणखी एक महिन्यांनी वाढण्याची शक्‍यता आहे.

शहरात अनुसूचित जाती-जमाती महिला, ओबीसी महिला, पुरुष खुला गट, महिला खुला गट आदी आरक्षणे झाली आहेत. त्यामुळे ही आरक्षणे वगळली तर पुण्यात ओबीसी आणि एससी ही दोनच आरक्षणे शिल्लक राहतात. आरक्षणाच्या सोडतीमध्ये पुण्यासाठी या दोन्ही पदांच्या आरक्षणाची चिठ्ठी टाकली जाईल. त्यातील जे आरक्षण निघेल, त्यावर शहराच्या महापौरपदाचे आरक्षण ठरेल. शहरात एससी आरक्षणापेक्षा ओबीसी आरक्षणासाठी भारतीय जनता पक्षामध्ये इच्छुकांची संख्या जास्त आहे.

आदेश आल्यानंतर पदे सोडू…

एका व्यक्‍तीकडे दोन पदे नकोत, अशी भाजपने “पॉलिसी’ ठरवली आहे. त्यामुळे आमदार झाल्यामुळे स्थायी समिती अध्यक्ष असलेले सुनील कांबळे आणि महापौर मुक्‍ता टिळक, सिद्धार्थ शिरोळे हे त्यांचे पद सोडणार का असा प्रश्‍न उपस्थित करण्यात आला. यावेळी अद्याप प्रदेशपातळीवरून कोणतेच आदेश आले नाहीत, सत्ता स्थापनेची गडबड सुरू आहे. त्यानंतर याबाबत चर्चा आणि विचार होईल, आणि त्यानंतरच पक्ष सांगेल ती कार्यवाही करण्यात येईल, असे कांबळे यांनी स्पष्ट केले.

सुनील कांबळे हे सध्या महापालिकेत स्थायी समिती अध्यक्ष आहेत, मुक्‍ता टिळक महापौर आहेत तर, सिद्धार्थ शिरोळे हे पीएमपीएमएलचे संचालक आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे दोन पदे ठेवण्याची पक्षाची पॉलिसी नाही. आमदार झाल्यामुळे त्यांना हे पद सोडावे लागणार आहे. टिळक यांच्या महापौर पदाची मुदत अनायसे संपलेलीच आहे. त्यामुळे सत्तास्थापनेनंतर पुढील महिन्यात त्या पदाची लॉटरी निघण्याची शक्‍यता आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)