नवी दिल्ली – कतारमधील अपीलीय न्यायालयाने भारतीय नौदलाच्या ८ माजी कर्मचाऱ्यांना सुनावलेली फाशीची शिक्षा कमी केली आहे. या सर्व माजी नौदल कर्मचाऱ्यांना कतारमधील न्यायालयाने गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये हेरगिरीच्या आरोपावरून फाशीची शिक्षा सुनावली होती. त्यांची शिक्षा कमी केली गेल्यामुळे या भारतीय माजी नौदल कर्मचाऱ्यांसाठी हा एक मोठा दिलासा आहे, असे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.
या सर्व भारतीयांना फाशीची शिक्षा सुनावली गेल्यामुळे भारत सरकारने त्यांना सर्व कायदेशीर मदत उपलब्ध करून दिली होती. तसेच त्यांना दूतावासाचे सहाय्यदेखील देण्यात आले होते. दुबईत झालेल्या कोप-२८ परिषदेच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कतारचे अमिर शेख तमिम बिन हमाद अल थानी यांचीही भेट घेतली होती. त्यानंतर या भारतीयांची फाशीची शिक्षा कमी केली जाणे हे भारतीय मुत्सद्देगिरीचेही यश मानले जाते आहे.
कतारमध्ये शिक्षा सुनावली गेलेले हे सर्व भारतीय दोहामधील अल दाहरा ग्लोबल टेक्नोलॉजीस कंपनीमध्ये नोकरी करत होते. त्यांना ऑगस्ट २०२२ मध्ये ताब्यात घेण्यात आले होते. त्यांच्यावरील आरोप कतारच्या प्रशासनाकडून उघड केले गेले नाहीत. त्यांना या वर्षी ऑक्टोबरमध्ये फाशीची शिक्षा सुनावली गेली होती.
या शिक्षेरोधात सुरक्षा प्रशिक्षण आणि सेवा देणारी कतारमधील एक खासगी कंपनी आणि भारत सरकारने कतारच्या न्यायालयात आव्हान याचिका दाखल केली होती. या पुढेही या भारतीयांना कायदेशीर मदत दिली जात राहिल, असे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. हे प्रकरण संवेदनशील असल्यामुळे या खटल्याचा आणि न्यायालयाच्या निकालाचा तपशील उघड केला जाणार नसल्याचेही परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.