पारनेर -शिवसेनेच्या पाच नगरसेवकांचा पुन्हा शिवसेनेमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत प्रवेश झाला. त्यानंतर पारनेर येथील आज पक्षाचे संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर यांच्या उपस्थितीत पदाधिकारी व नगरसेवकांची समन्वय बैठक पार पडली.
या बैठकीस आ. नीलेश लंके यांनी काही काळ हजेरी लावली. मात्र माजी आमदार विजय औटी यांनी या बैठकीकडे पाठ फिरविली. त्यापूर्वी औटी यांनी कोरगावकर यांच्याशी बंद खोलीत चर्चा केली. त्यामुळे या वेळी काय चर्चा झाली, याचा तपशील मात्र समजू शकला नाही.
कोरगावकर यांच्या उपस्थितीत शासकीय विश्रामगृहात ही बैठक पार पडली. त्यांच्यासमवेत जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले व प्रकाश कुलट उपस्थित होते.
या बैठकीला राष्ट्रवादीचे आमदार नीलेश लंके यांनी काही काळ उपस्थिती लावली. ते गेल्यानंतर शिवसेनेचे उप जिल्हाप्रमुख रामदास भोसले, सभापती गणेश शेळके, तालुकाप्रमुख विकास रोहकले, नितीन शेळके, नीलेश खोडदे यांनी उपस्थिती लावली. मात्र माजी आमदार औटी यांनी या बैठकीकडे पाठ फिरवली. बैठकीला शिवसेनेचे नगरसेवक डॉ. मुदस्सीर सय्यद, नंदकुमार देशमुख, किसन गंधाडे, वैशाली औटी व नंदा देशमाने हे पाच नगरसेवक उपस्थित होते.
शिवसेनेतून राष्ट्रवादीत व राष्ट्रवादीतून पुन्हा शिवसेनेत नगरसेवकांची झालेली पक्षवारी राज्यभर चर्चिली गेली. त्यानंतर हे नगरसेवक पुन्हा मुख्यमंत्री ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेत परतले.
मात्र स्थानिक नेतृत्वावर नाराजी असल्याचे त्यांनी त्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सांगितले होते. त्यानुसार मुख्यमंत्री ठाकरे यांनी संपर्क प्रमुख कोरगावकर व स्थानिक माजी आमदार औटी व शिवसेनेचे पदाधिकारी, तसेच आमदार लंके यांच्या समन्वयाने या नगरसेवकांमध्ये तसेच महाविकासआघाडीमध्ये समन्वय ठेवावा, असे सांगण्यात आले. त्यानुसार कोरगावकर यांनी पारनेर येथे बैठक घेतली.
दरम्यान कोरगावकर यांनी विश्रामगृहावरील बैठकीपूर्वी माजी आमदार औटी यांची त्यांच्या संपर्क कार्यालयामध्ये भेट घेतली. यावेळी औटी यांनी त्यांचा सत्कार केला. त्यानंतर जवळपास दोन तास दोघांमध्ये बंद खोलीच चर्चा झाली. त्यानंतर कोरगावकर यांनी नगरसेवक व पदाधिकारी समन्वय बैठकीला हजेरी लावली. सर्वांनी एकत्र राहून तालुक्यामध्ये शिवसेना पुन्हा वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन यावेळी केले.