तरुणांच्या नशिबी ‘जॉबडाऊन’

Madhuvan

बेरोजगारीची मोठी समस्या : करोनाने अनेकांच्या नोकऱ्या गिळल्या

पिंपरी – पिंपरी चिंचवड शहर हे औद्योगिकनगरी म्हणून ओळखले जाते. शहरात हिंजवडी, तळवडे यासारखे आयटी पार्क आहेत. त्यामुळे तरुणाई याठिकाणी स्थिरावली आहे. मात्र करोनामुळे अनेक संस्था, कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या तरुणांवर संक्रांत आली आहे. करोनाचे कारण पुढे करत कर्मचाऱ्यांना कामावरुन काढले जात आहे. त्यामुळे तरुणांना बेरोजगारीला सामोरे जावे लागत आहे.

विशेषतः ही समस्या उच्चशिक्षित तरुणांना अधिक भेडसावत आहे. कंपनीला उत्पादन क्षेत्रात काम करणारे कामगार हवे आहेत, परंतु बॅक ऑफिस, अकाउंट, ऍडमिन, सेल्स तसेच उत्पादन वगळता अन्य विभागात कार्यरत असलेल्या उच्चशिक्षित कर्मचाऱ्यांना मात्र घरचा रस्ता दाखविला जात आहे.

पिंपरी चिंचवड शहरामध्ये राज्यभरातून लोक कामधंद्यासाठी स्थायिक झाले आहे. नवीन आकार घेऊ पाहणारे शहर, नवीन संधी यामुळे अनेक तरुणांची पाऊले या शहराकडे वळाली. नवीन कंपन्या आल्याने तरुणांना रोजगार मिळाला. उद्योगनगरीत आलेल्या प्रत्येकाला काम मिळत असल्याने शहरात कामगार वर्ग स्थिरावला. मार्च महिन्यामध्ये शहरात करोनाची इंट्री झाली. त्यामुळे कामगारांवर मोठी सक्रांत आली. अनेक कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांची कपात केली जाऊ लागली.

ऑटोमोबाइल, इंजिनिअरिंग या क्षेत्रातील लहान-मोठ्या उद्योगांना थेट उत्पादनाशी निगडीत असलेल्या कामगारांची मोठी गरज असल्याचे दिसून येते तर दुसरीकडे मात्र कार्पोरेट, आयटी तसेच सर्व्हिस सेक्‍टरमध्ये चांगल्या पगारावर काम करत असलेल्या उच्चशिक्षित कर्मचाऱ्यांची छाटणी सुरू झाली आहे.

लॉकडाऊनमध्ये कंपन्या अडीच महिने बंद होत्या. जून महिन्यामध्ये अनलॉक सुरु करण्यात आले. त्यामुळे मर्यादित कामगारांमध्ये कंपन्या सुरु करण्यात आल्या. मात्र करोना विषाणूच्या संक्रमणामुळे संपूर्ण देशातील उद्योग व्यवसाय ठप्प झाला. त्याचा परिणाम शहरातील उद्योग धंद्यांवरही पडला. त्यामुळे कंपनी प्रशासनाने अनेकांना घरचा रस्ता दाखवला. परिणामी मोठ्या नोकरीच्या आशेने शहरात आलेल्या अनेक तरुणांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली.

गड्या आपला गावच बरा
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये करोनाचे थैमान सुरु आहे. लॉकडाऊनच्या काळामध्ये अनेकांनी आपले गाव गाठले होते. मात्र जून महिन्यामध्ये पुन्हा अनेकजण करोना जाईल आणि सर्व सुरळित होईल या आशेने शहरामध्ये परतले. मात्र शहरामध्ये करोनाचे थैमान सुरु असून नोकऱ्यांवरही त्याचा परिणाम झाला. त्यामुळे बेरोजगार झालेले तरुण पुन्हा एकदा गावाकडे वळू लागले आहेत. तर गेल्या तीन महिन्यांपासून अनेकजण गावी आहेत. ओस पडलेली जमीन, घऱाकडे झालेले दुर्लक्ष व दुरावलेली नाती या साऱ्यांशी चाकरमानी नव्याने जुळवून घेत आहे. शहरामध्ये नोकरी करण्यापेक्षा गावातच स्वतः चा काहीतरी व्यवसाय करण्याची अनेकांची मानसिकता झाली आहे. अनेकजण गावाकडील व्यवसायासाठी जुळवाजुळव करत आहेत. त्यामुळे तरूण वर्ग आता गड्या आपला गावच बरा असे म्हणत आहे.

गावाकडे शेती कमी असल्याने मी कामासाठी शहरात आलो होतो. करोनामुळे मध्ये दोन महिने कंपन्या बंद होत्या. त्या काळात पगारही मिळाला नाही. आता कुठे कंपनी सुरु झाली होती. तर पुन्हा लॉकडाऊन करण्यात आले आहे. दिवसेंदिवस रुग्णही मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. इथे राहण्यापेक्षा गावात काहीतरी व्यवसाय केला तर तो परवडेल. नोकरीमध्ये जीवन सुरक्ष्ति वाटत नाही. गावाकडे शेतीआधारित काहीतरी व्यवसाय करेल.
– चंद्रकांत गवारी, अकोले


मी गेले पाच वर्ष पिंपरी चिंचवडमध्ये काम करीत आहे. मागच्या महिन्यात कंपनीने अचानक सांगितले तुम्ही कामावर येऊ नका. मी दुसऱ्या कंपन्यांमध्ये काम शोधत आहे. मात्र कुठेच जागा शिल्लक नाही. आता जवळचे पैसे पण संपत आले आहेत. त्यामुळे गावी जाणार आहे. घरी शेती करून काहीतरी छोटामोठा व्यवसाय करण्याचा विचार आहे. गावाकडे नातेवाईक व मित्रांच्या सहवासात राहता येईल. शहरामध्ये जीवन जगणे सद्यस्थितीत कठीण झाले आहे.
– मनोज साबळे, अहमदनगर

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.