Sudhir Mungantiwar on Dilip Walase-Patil : मुंबईच्या राणीबागेमधील ‘पेंग्विन’ची चर्चा मुंबईकरांपेक्षा राजकीय नेत्यांमध्येच अधिक असते. अनेकदा सरकारवर टीका करताना पेंग्विनच्या देखभालीवरील खर्चाचा दाखल देण्यात येतो. अशातच आता ‘पेंग्विन’च्या मुद्द्यावरून थेट राज्याच्या विधानसभेत सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधण्यात आला आहे. भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी, राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यावर खोचक शब्दांमध्ये निशाणा साधताना पेंग्विनचा संदर्भ दिला दिला आहे.
नेमकं काय घडलं?
विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनामध्ये बोलताना आमदार मुनगंटीवार यांनी एक किस्सा सांगितला. मुनगंटीवार म्हणाले, “मला एक गरीब विद्यार्थी असं म्हणाला की मला नोकरीच मिळत नाही. आत्ता मी १०० रुपये रोजीनं काम करतो. मी म्हटलं चांगले दिवसही येतील ना. तो म्हणाला साहेब मला तर वाटतं की खरंच मरावं आणि राणीबागेच्या पेंग्विनच्या रुपाने जन्म घ्यावा. पण मी विचारलं, असं तुला का वाटतं? तो मला हिशोब सांगत होता, की त्या पेंग्विनवर रोज २० हजार रुपये खर्च होतात. एका तासाला ८३३ रुपये म्हणजे महिन्याला ६ लाख रुपये खर्च होतात.”
मुनगंटीवार वळसे पाटलांना म्हणाले…
यावेळी बोलताना मुनगंटीवार यांनी राज्याचे गृहमंत्री वळसे पाटील यांना उद्देशून, “वळसे पाटील साहेब, एवढा पगार तर मंत्री म्हणून तुम्हाला नाही हो. तुमच्यापेक्षा पेंग्विन वरच्या श्रेणीत येतो. कारण मंत्र्याचा पगार २ लाख ५२ हजार किंवा ५३ हजार आहे. पण त्याचा (पेंग्विन) ६ लाख आहे हो. म्हणजे मंत्र्यापेक्षा पेंग्विन पॉवरफुल! १५ कोटी रुपये पेंग्विनवर खर्च होतो. आमची मानसिकता किती भिकारी असावी.” असं म्हणत निशाणा साधला.
मुनगंटीवार यांनी याबाबतचा व्हिडीओ आपल्या ट्विटर खात्यावरून शेअर केला आहे.
मरावे आणि पेंग्विन व्हावे..! pic.twitter.com/4IKZ8Ew2ZH
— Sudhir Mungantiwar (@SMungantiwar) December 24, 2021