पुणे – राज्यातील पर्यटन वृद्धीकरिता स्थापन केलेल्या पर्यटन विकास महामंडळाच्या रिसॉर्टसमधील राजकीय हस्तक्षेप टाळण्याकरिता महामंडळाकडून रिसॉर्टस् चालवायला सुरुवात केली आहे. या माध्यमातून स्थानिक नागरिकांना रोजगार उपलब्ध करून देण्यावर भर दिला आहे. प्रायोगिक तत्वावर पानशेत, महाबळेश्वर, शिर्डी व भीमाशंकर येथे हा पथदर्शी प्रकल्प राबविला जात आहे.
पर्यटन विकास महामंडळाने राज्यभरात रिसॉर्टसचे जाळे तयार केले आहे. या रिसॉर्टसमध्ये पर्यटकांना राहण्याबरोबर नाश्ता व जेवण या सुविधा पुरविल्या जातात.
पर्यटनाच्या हंगामात कोणतेही अतिरिक्त शुल्क न आकारता वाजवी दरात या सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. राज्यातील काही लॉज व हॉटेल्समधील गैरप्रकार निदर्शनास आल्यानंतर पर्यटन महामंडळाच्या सुविधांवरील विश्वास आणखी वाढला आहे.
दरम्यान, राज्य सरकारने पर्यटन विकास महमंडळाची स्थापना केल्यानंतर त्याचे स्वतंत्र अस्तित्व ठेवले आहे. त्यामुळे राज्य सरकारकडून कोणतीही आर्थिक मदत मिळत नाही.