कर्जत (प्रतिनिधी) – कर्जत व जामखेड तालुक्यातील प्राथमिक शाळा शैक्षणिक क्षेत्रात मॉडेल व्हाव्यात यासाठी प्रयत्न सुरू आहेत. शाळांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचे नियोजन सुरू असून यासाठी शिक्षकांनी सहकार्य करावे. शिक्षकांवरील अशैक्षणिक कामांचा बोजा कमी करून त्यांना जास्तीत जास्त वेळ अध्यापनासाठी मिळावा यासाठी प्रयत्न केले जातील. शिक्षकांसाठी जुनी पेन्शन, बीएलओचे काम, बदली बाबतच्या अडचणी अशा शिक्षकांच्या प्रश्नावर विधानसभेत आवाज उठवण्यात येईल असे आश्वासन आमदार रोहित पवार यांनी दिले.
महाराष्ट्र राज्य शिक्षक संघ, गुरुमाऊली मंडळ, महिला आघाडी व शिक्षक बॅंक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कर्जत येथील सत्कार समारंभात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी रणजित सुद्रिक होते.
यावेळी आमदार रोहित पवार, पंचायत समितीच्या सभापती अश्विनी कानगुडे, उपसभापती हेमंत मोरे, शिक्षक बॅंकेचे चेअरमन संतोष दुसूंगे यांचा सत्कार करण्यात आला. पोलीस उपअधीक्षक संजय सातव, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष काकासाहेब तापकीर, जिल्हा संघाचे अध्यक्ष बापुसाहेब तांबे, नगरसेविका मनिषा सोनमाळी, उपक्रमशील शिक्षक रविंद्र कडूस यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. यावेळी अश्विनी कानगुडे, बापुसाहेब तांबे यांनी मनोगते व्यक्त केली. शरद सुद्रिक यांनी प्रास्ताविक तर बाळासाहेब तापकीर यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी पांडुरंग खराडे, दत्तात्रय राऊत, उद्धव घालमे, संदिप ठाणगे, किशोर माकुडे उपस्थित होते.