मुंबई : काही महिन्यापूर्वी राज्यात शिवसेनेमध्ये बंडखोरी झाली आणि ४० आमदार शिंदेंच्या गटात सामील झाले. या शिंदे गटाच्या बंडखोरीमुळे राज्यातील मविआ सरकार कोसळले. या ४० आमदारांमध्ये प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू यांचाही समावेश होता. दरम्यान, त्यांच्या याच सहभागावर नागरिकांनी संताप व्यक्त केल्याचे पाहायला मिळत आहे. असेच एका वयोवृद्ध व्यक्तीने बच्चू कडूंची गाडी आडवून त्यांना झापल्याची घटना समोर आली आहे. तुम्ही गद्दारी का केली? असा थेट सवाल वृद्धाने विचारला आहे.
बच्चू कडू यांनी नुकतेच धाराशिव जिल्ह्याचा दौरा केला. यावेळी संबंधित वृद्ध व्यक्तीने गर्दीत घुसून बच्चू कडू यांना शिंदे गटात सामील का झाला असा जाब विचारला आहे. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ समोर आला असून सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड वेगानने व्हायरल होत आहे.
80 वर्षाच्या व्यक्तीने बच्चू कडू यांना कोर्टातून बाहेर येताना अडवून आपण जनतेसोबत गद्दारी केली आपण गद्दार आहात असं म्हटलं pic.twitter.com/YESQaJwaC7
— kailas chaudhari 90 (@kreporter2014) February 28, 2023
संबंधित वयोवृद्ध व्यक्तीने बच्चू कडूंचा हात पकडून , तुम्ही असे का वागायला लागले आहात, जरा नीट वागा… राज्यघटनेच्या चौकटीत वागा… जनतेला त्रास देऊ नका… अशा शब्दांत वृद्धाने बच्चू कडूंना जाब विचारला. यावेळी बच्चू कडू यांच्या काही कार्यकर्त्यांनी संबंधित वयोवृद्ध व्यक्तीला दमदाटी करण्याचा प्रयत्न केला. यावेळी वयोवृद्धाने म्हटलं, “ही गद्दारी नाही, तर गद्दारीचा बाप आहे का? यांचं वागणं नीट आहे का?” असे सवाल वयोवृद्धाने विचारले.
यानंतर बच्चू कडू यांनी कार्यकर्त्यांच्या मदतीने घटनास्थळावरून काढता पाय घेतला. पण वयोवृद्ध व्यक्ती गाडीच्या समोर आली. त्यांनी बच्चू कडूंना उद्देशून म्हटलं, “यांचं वागणं योग्य नाही. त्यांनी जनतेबरोबर गद्दारी केली. ते एका डाकूबरोबर गेले. बच्चू कडूंना ज्या धोरणाने निवडून दिलं. ज्या आशेनं निवडून दिलं, तसं ते वागत नाहीत. हे जे चाललं आहे, ते योग्य नाही, घटनाबाह्य आहे,” अशी प्रतिक्रिया संबंधित वयोवृद्ध व्यक्तीने दिली.