कोथरूड -साहेब… महापालिकेने तयार केलेला पादचारी मार्ग चोरीला गेला? मागील काही दिवसांपासून पादचारी मार्ग दिसतच नाही, त्यामुळे हा मार्ग तत्काळ शोधून पादचाऱ्यांना दिलासा द्यावा, पादचारी मार्ग चोरणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच कोथरूड शाखेचे अध्यक्ष विराज डाकवे यांनी कोथरूड-बावधन क्षेत्रीय अधिकारी आणि पथ विभाग यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
पौड रस्त्यावरील आनंद नगर परिसरात मेट्रो स्टेशनपासूनचा पदपथ मोठा आणि सुटसुटीत आहे, त्यामुळे पादचारीही सुरक्षितपणे चालू शकतात. मात्र, येथील चौकाजवळ येताच पदपथ गायब झाल्याचे दिसून येते, त्यामुळे नागरिकांना धोकादायक पद्धतीने रस्त्यावरून चालावे लागते. हा चौक वर्दळीचा असून, लहान मुलांसह वयोवृद्ध व्यक्ती मोठ्या प्रमाण पदपथाचा वापर करतात.
दरम्यान, याठिकाणी महापालिकेने सार्व रस्ता, पदपथ, सायकल मार्ग असून त्यावर कोणी अतिक्रमण केल्यास कारवाई करण्यात येईल, असा फलक लावला आहे. फलक आहे, मात्र तेथील पदपथ, सायकल ट्रॅकच गायब झाला आहे. त्यामुळे नागरिकांसाठी सुरक्षित लक्षात घेता हा पदपथ आणि सायकल ट्रॅक तत्काळ शोधावा, पदपथ सापडला नाही तर कार्यकर्ते मनसे स्टाइलने आंदोलन करतील, असा इशारा विराज डाकवे यांनी पालिका प्रशासनास दिला आहे.