बिबवेवाडी – प्रेयसीच्या घरच्यांनी लग्नास नकार दिला म्हणून एका प्रियकराने आपल्या मित्राच्या साथीने बिबवेवाडी येथील आण्णाभाऊ साठे नगर परिसरातील वाहनांची तोडफोड करत दहशत निर्माण केली. ही घटना बुधवारी मध्यरात्री एकच्या सुमारास घडली.
याप्रकरणी बिबवेवाडी पोलिसांनी बारा तासाच्या आत दोघांना अटक केली असून, शरद तुकाराम पाटोळे (वय २०, रा.टिळेकरनगर), कुमार गोपाळ राठोड, (वय १९ रा. अण्णाभाऊ साठेनगर) अशी त्यांची नावे आहेत. याबाबत जमीर शेख, (वय ४०) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शरद पाटोळे हा टिळेकरनगर येथे राहतो. त्याचे अनेक दिवसापासून साठे नगरमधील एका मुलीसोबत प्रेमसंबध होते. मात्र लॉकडाऊन काळात मुलीच्या आईने दोघांच्या लग्नाला नकार दिला होता. तेव्हापासून शरद पाटोळे हा रागात होता. अनेकदा प्रयत्न करून देखली प्रेयसीच्या घरच्यांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्यामुळे पाटोळे याने यापुर्वी सुद्धा दहशत माजवण्याचा प्रकार करून मुलीच्या घरच्यांना घाबरवले होते.