पुणे- पुरंदर तालुक्यात प्रस्तावित असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या भूसंपादनासाठी मोबदल्यासाठी चार पर्याय पुढे आले आहे. यामध्ये थेट खरेदीने म्हणजे एकरकमी मोबदला देणे, शेतकऱ्यांना शेती महामंडळाची पर्याय जागा देणे, कोची विमानतळाच्या धर्तीवर विमानतळ विकास कंपनीमध्ये भागधारक म्हणून सहभागी करून घेणे आणि पर्यायी शेतजमीन, निर्वाह भत्ता देणे या मोबदल्यांच्या पर्यायावर विचार सुरू आहे.
पुरंदर विमानतळासाठी फक्त भूसंपादन हा एक महत्त्वाचा टप्पा बाकी आहे. त्यावर अजूनही निर्णय झालेला नाही. यासाठी अधिकारी नेमण्यात आले आहेत. भूसंपादनासाठी यापूर्वीच जिल्हा प्रशासनाकडून चार पर्याय सुचविण्यात आले आहेत. या चार पर्यायांचा प्रस्ताव यापूर्वीच राज्य सरकारकडे पाठवण्यात आला आहे.
पुरंदर येथे विमानतळ उभारण्यासाठी सात गावांमधील सुमारे 2 हजार 832 हेक्टर जागा लागणार आहे. या कामासाठी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीला विशेष अधिकार देण्यात आले आहेत. 2 हजार 832 हेक्टर पैकी 2 हजार हेक्टरवर प्रत्यक्षात विमानतळ उभारण्यात येणार आहे. जागेच्या भूसंपादनासाठी सहा हजार कोटी रूपये खर्च अपेक्षित आहे.
विमानतळाचा मास्टर प्लॅन तयार करण्याचे काम यापूवीच कंपनीकडून “डार्स’ या कंपनीला देण्यात आले आहे. तर उर्वरित 832 हेक्टर जागेवर विमानतळासाठी आवश्यक त्या पायाभूत सुविधा उभारण्यासाठी विकास आराखडा कंपनीकडून करण्यात येत आहे.