जुलैमध्ये “मारुती’ची कार विक्री गेली लाखांवर
हिरो मोटोकॉर्पने जुलै महिन्यात विकल्या 5 लाख 14 हजार बाईक
नवी दिल्ली – लॉकडाऊन अंशतः संपुष्टात आल्यानंतर वाहन वितरकांच्या कार्यालयातील वर्दळ वाढू लागली आहे. जुलै महिन्यामध्ये कार कंपन्यांच्या विक्रीत लक्षणीय नोंद झाली आहे.जुलै महिन्यात मारुती सुझुकी या भारतातील सर्वात मोठ्या कार कंपनीने देशात 1,01,307 कार विकल्या.
गेल्या वर्षी जुलै महिन्यात मारुतीने देशात 1,00006 कार विकल्या होत्या. याचा अर्थ मारुतीची देशांतर्गत कार विक्री 1.3 टक्क्यांनी वाढली. मात्र, मारुती कंपनीच्या निर्यातीत 27 टक्क्यांची घट होऊन या महिन्यात कंपनीने केवळ 6757 वाहने निर्यात केली.
ह्युंदाई मोटर इंडिया या कंपनीने जुलै महिन्यामध्ये देशांत 38 हजार 200 कार विकल्या गेल्या. टोयोटा किर्लोस्कर मोटार कंपनीने जुलै महिन्यामध्ये 5 हजार 386 कार विकल्या.
एमजी मोटार कंपनीने जुलै महिन्यामध्ये 2,105 कार विकल्या आहेत. महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीने जारी केलेल्या माहितीनुसार या कंपनीने जुलै महिन्यामध्ये 25 हजार 678 कार विकल्या आहेत. लॉकडाऊनमधील काळाच्या तुलनेमध्ये आता विक्री हळूहळू वाढत आहे. आगामी काही महिन्यांमध्ये परिस्थिती पूर्णपणे रुळावर येईल, असे या कंपनीने जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे.
पाऊस पडल्यामुळे ट्रॅक्टर विक्री जोमात
करोनाचा शेतीवर फारसा परिणाम झालेला नाही. त्यातच पाऊस चांगला पडला आहे. यामुळे ट्रॅक्टर विक्रीवर परिणाम झालेला नाही. महिंद्रा कंपनीने जुलै महिन्यात 25 हजार 402 ट्रॅक्टर विकले. गेल्या वर्षातील जुलै महिन्याच्या तुलनेमध्ये या विक्रीत 27 टक्क्यांची वाढ झाली आहे. कंपनीने या महिन्यांमध्ये 939 ट्रॅक्टरची निर्यात केली. बहुतांश ट्रॅक्टर कंपन्यांनी जुलै महिन्यात ट्रॅक्टरच्या विक्रीत वाढ झाली असल्याचे जाहीर केले आहे.